अपघात रोखण्यासाठी ‘आयडीटीआर’; नागपुरात उभारले जाणार १७.९० कोटींचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:15 AM2018-03-28T10:15:47+5:302018-03-28T10:15:57+5:30
एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. याला घेऊनच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नागपुरात वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयडीटीआर) मंजुरी दिली आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ता अपघातात दर सहा मिनिटाला एक व्यक्ती दगावते तर दर मिनिटाला एक व्यक्ती जखमी होते. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. विशेष म्हणजे, एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. याला घेऊनच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नागपुरात वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयडीटीआर) मंजुरी दिली आहे. १७ कोटी ९० लाख रुपये खर्चून ही संस्था कोराडी मार्गावरील गोधनी येथे उभारली जाणार आहे. या संस्थेमधून वाहनचालकांना अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने प्रशिक्षण दिले जाईल. भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमच्या अपंग होतात. रस्ता अपघात टाळण्यासारखे असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. वेळ, वेग व वाहतुकीचे नियम यामधील संतुलन बिघडल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. अधिक गतीने वाहन चालविणे, चालविताना वाहतुकीचे नियम तोडणे हल्ली ‘फॅशन’ झाली आहे, परंतु हीच ‘फॅशन’ जीवावर बेतणारी ठरत आहे. अपघातात एखादा तरुण मृत्युमुखी पडला, तर केवळ एक व्यक्ती जीव गमावत नाही, तर त्याचे सारे कुटुंब मृत्युमुखी पडते. त्याची वैयक्तिक चूक पुढील सारा अनर्थ घडविते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘आयडीटीआर’ महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांच्या चुका दाखवून त्या दुरुस्त करण्याचे कार्य या संस्थेतून चालणार आहे. आरटीओ नागपूरकडून गेल्या दोन वर्षांपासून या संस्थेच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू होते. अखेर केंद्राने नुकतीच याला मंजुरी देऊन १७ कोटी ९० लाख ५ हजार ८४२ रुपयांच्या खर्चाला मान्यता दिल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.
२० टक्के अपघात कमी होण्याची शक्यता
नागपूरच्या ‘आयडीटीआर’ या संस्थेत शासकीय वाहनचालकांसोबतच खासगी वाहन चालकांनादेखील प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याची सोय राहणार आहे. विदर्भातील आगारातील वाहनचालकांना या ठिकाणी पाचारण करून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामुळे आणि मार्गदर्शनामुळे २० टक्के अपघात कमी होण्याची शक्यता आहे.
काय आहे ‘आयडीटीआर’
‘आयडीटीआर’ ही अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने चालकांच्या वेगवेगळ्या चाचण्यात घेऊन त्यांना वाहन चालविण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या ठिकाणी वाहनचालकांच्या डोळ्यांच्या तपासणीपासून ते वाहनावर नियंत्रण मिळवणे, ‘रिअॅक्शन टेस्ट’ उपलब्ध करून दिले जाते. साधारण ५० चालकांचा एक गट तयार करून हे प्रशिक्षण दिले जाते.
वाहन चालविण्याचे पक्के लायसन्स मिळाल्यानंतरही अपघात होतात, कारण वाहनचालकांना आपल्या चुका कळत नाही, किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. ‘आयडीटीआर’मधून वाहनचालकांच्या चुका दाखवून त्या दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिणामी, संभावित अपघात टळतील, अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
-शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर