जडीबुटीवाल्यांचे ‘टार्गेट’ तरुणाई : नागपुरात सर्रास लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 09:24 PM2018-11-26T21:24:00+5:302018-11-26T21:25:07+5:30

रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या तरुणांना थांबवून त्यांच्यात शारीरिक दोष असल्याचे सांगून नसलेला आजार गळी पाडतात, जडीबुटीची भुकटी दाखवित ‘ये है इसका इलाज’ असे सांगून ५० ते १०० रुपये आकारतात. १०० टक्के रोग दूर होण्याची हमी देतात. दिवसाकाठी रोज शेकडो तरुण अशा रस्त्याच्या कडेला बसलेल्या जडीबुटीवाल्यांच्या जाळ्यात अडकत असून, पैशासोबतच आपला जीवही टांगणीला लावत आहेत.

Jadibutiwala's 'Target' youth: Openly duping in Nagpur | जडीबुटीवाल्यांचे ‘टार्गेट’ तरुणाई : नागपुरात सर्रास लुबाडणूक

जडीबुटीवाल्यांचे ‘टार्गेट’ तरुणाई : नागपुरात सर्रास लुबाडणूक

Next
ठळक मुद्देशारीरीक दोष सांगून अडकवताहेत जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या तरुणांना थांबवून त्यांच्यात शारीरिक दोष असल्याचे सांगून नसलेला आजार गळी पाडतात, जडीबुटीची भुकटी दाखवित ‘ये है इसका इलाज’ असे सांगून ५० ते १०० रुपये आकारतात. १०० टक्के रोग दूर होण्याची हमी देतात. दिवसाकाठी रोज शेकडो तरुण अशा रस्त्याच्या कडेला बसलेल्या जडीबुटीवाल्यांच्या जाळ्यात अडकत असून, पैशासोबतच आपला जीवही टांगणीला लावत आहेत.
अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतींमध्ये दररोज नवनवे संशोधन पुढे येत आहे. नव्या संशोधनाद्वारे वेगवेगळ्या आजारांवरील औषधांचा शोध लागत आहेत. असे असतानाही रस्त्यावरील जडीबुटीवाल्यांचा धंदा जोमात सुरू आहे. शहरात असे दोनशेच्यावर जडीबुटीवाले आहेत. यातील बहुसंख्य निरक्षर आहेत. पारंपरिक व्यवसाय म्हणून त्यांनी हा व्यवसाय आत्मसात केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, परंतु यातील अनेकांकडे जडीबुटीचे विशेष ज्ञान नसल्याचे सहज लक्षात येते.
रस्त्याच्या कडेला बसून जडीबुटी व्यवसाय करणारे अनेक जण ‘सेक्स’च्या नावाने आपली औषधी खपवितात. स्वप्नदोष, शीघ्रपतन आदी दोष सांगून यावर शिलाजीत, मदनमस्त, कामराज मोदक, अमर फळ, बरफ फळ, इश्क अम्बर, काली मुसली, सफेद मुसली आदी जडीबुटीच्या नावाने विकतात. विशेष म्हणजे ‘मदनमस्त’ आणि ‘कामराज मोदक’ याच्या १० ग्रामची किमत ३०० रुपये तर अमर फळ, बरफ फळ याची किमत ६०० रुपये तोळा आहे. ग्राहकाशी भावठाव करीत ५० ते १०० रुपयापर्यंत हे जडीबुटी विकतात. यामुळे ग्राहकाच्या हातात पडणाऱ्या जडीबुटीत नेमके काय असते, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. धक्कादायक म्हणजे, पोलीस, अन्न व औषध प्रशासन यांच्या डोळ्यादेखत हा व्यवसाय सुरू आहे. मात्र कुणी कधीच कारवाई करताना किंवा त्यांच्याकडील औषधी तपासताना दिसून येत नाही.
‘कोणत्याही रोगावर हमखास इलाज’
चर्मरोगापासून ते मधुमेहापर्यंतच्या आणि कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीवर रामबाण इलाज असल्याचा दावा हे जडीबुटीवाले करतात. परंतु ही औषधे खरेच उपयुक्त आहेत का याचे उत्तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ ठामपणे देत नाही. जडीबुटीवाल्यांची ही जमात वंशपरंपरेने राजवैद्य असल्याचा दावा करते.

 

Web Title: Jadibutiwala's 'Target' youth: Openly duping in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.