शहिदांच्या स्मृतींचा जागर
By admin | Published: July 28, 2014 01:30 AM2014-07-28T01:30:58+5:302014-07-28T01:30:58+5:30
कारगीलसारख्या दुर्गम आणि अतिउंचावरील ठिकाणी पाकिस्तानी घुसखोरांवर भारतीय सैन्याने मिळविलेला विजय हा जगात अपूर्व आहे, अशा शब्दात माजी लष्करप्रमुख व केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग
कारगील विजय हा जगात अपूर्व आहे : व्ही. के. सिंग
नागपूर : कारगीलसारख्या दुर्गम आणि अतिउंचावरील ठिकाणी पाकिस्तानी घुसखोरांवर भारतीय सैन्याने मिळविलेला विजय हा जगात अपूर्व आहे, अशा शब्दात माजी लष्करप्रमुख व केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी कारगील विजयाचा गौरव केला. या युद्धाने भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याची प्रेरणा दिली आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
भोसला मिलिटरी स्कूलतर्फे १५ वा कारगील विजयदिनाचा कार्यक्रम वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. शिस्तबद्ध संचलन व त्यानंतर माजी लष्करप्रमुख डॉ. व्ही. के. सिंग आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना सिंग म्हणाले, कारगील युद्धात सैनिकांचे धैर्य-शूरता व त्याच वेळी तेव्हाच्या वाजपेयी सरकारची मुत्सद्देगिरी त्यामुळे हा विजय शक्य झाला.
देशप्रेम काय असते, हे या युद्धाने शिकविले. देशप्रेम हा केवळ एक शब्द नसून तो शिकण्यासाठी त्याकडे आकर्षित होण्याची गरज असते. लष्करी सेवा देणे म्हणजे आपण समाजाकडून जे घेतले त्याची परतफेड करण्यासारखे आहे.
कारगील युद्धाची भीषणता व आपल्या सैनिकांनी दाखविलेले शौर्य याचा अनुभव त्या भागात गेल्यावर येतो. तेथील उंचचउंच डोंगररांगामध्ये राहून हे युद्ध आपल्या सैनिकांनी लढले, जिंकले, त्याची तोड नाही, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
आज देशात समस्या अनेक आहेत. पाकिस्तान सातत्याने दहशतवाद पसरवत आहे. पाच राज्यात माओवाद फोफावला आहे. या सर्व आव्हानांचा आपल्याला सामना करायचा आहे. त्यासाठी पुढील पिढी घडवण्याच्या दृष्टीने भोसला मिलिटरी स्कूलसारख्या शाळांची गरज त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाआधी शाळेच्या विद्यार्थ्यांनी धरमपेठ कॉमर्स कॉलेज ते देशपांडे सभागृह व एलआयटी ते देशपांडे सभागृह या मार्गावर पथसंचलन करून नागपूरकरांचे लक्ष वेधले. देशपांडे सभागृहाच्या प्रांगणात ‘अमर जवान’ स्मारक उभारून तेथे शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
सीएचएमईएसचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव तरुण पटेल, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष शैलेंद्र जोगळेकर, शाळेचे कमांडंट कर्नल (निवृत्त) जे. एस. भंडारी, मुख्याध्यापक ललित जोशी, एनसीसी ओटीएचे कमांडंट मेजर जनरल आर. के. शर्मा उपकमांडंट ब्रिगेडिअर परितोष पंत, सोनेगाव हवाईतळाचे प्रमुख एअर कमोडोर आलोक शर्मा , एनसीसीचे ग्रुप कमांडर एल. के. जैन, संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह रवी जोशी, महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता, आ. विकास कुंभारे, उपमहापौर जैतुनबी अन्सारी, देवेंद्र दस्तुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)