बॉम्बस्फोटाची धमकी देणारा जगदीश उईके पोलिसांच्या ताब्यात; पोलिसांकडून कसून चौकशी सुरू
By योगेश पांडे | Published: October 31, 2024 10:08 PM2024-10-31T22:08:13+5:302024-10-31T22:08:21+5:30
मागील काही दिवसांपासून विमानतळांना उडविण्याची धमकी येत असल्याने विमानसेवा प्रभावित झाली होती.
नागपूर : देशभरातील विविध विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा आरोपी जगदीश उईके अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सायबर सेलकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईबाबत पोलिसांकडून गुप्तता बाळगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून विमानतळांना उडविण्याची धमकी येत असल्याने विमानसेवा प्रभावित झाली होती. दिवाळीपूर्वी २५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान काही दहशतवादी संघटना ३० ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याबाबतचा ई-मेल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महासंचालक रेल्वे सुरक्षा दल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना पाठविण्यात आले होते. त्यानंतर नागपूर पोलिस सतर्क झाले. ई-मेल पाठविणाऱ्या तरुणाची पोलिसांनी ओळख पटवली. याआधी जगदीशला २०११ मध्ये दहशतवाद्यांवर लेख लिहिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान नागपूर पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाला २१ ऑक्टोबर रोजी जगदीशने ई-मेल पाठविल्याचे निष्पन्न झाले होते. जगदीशच्या ई-मेलनुसार, सहा विमानतळ हे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे लक्ष्य आहेत.
याशिवाय विविध विमान कंपन्यांच्या ३१ विमानांचे अपहरण करण्यात येणार आहे. त्याच्याकडे ‘२५ एमबीए - एमटीआर-१०’ हा गुप्त टूलकिट कोड आहे. या कोडचा अर्थ पाच बाजार, पाच बसस्टँड, सहा विमानतळ, पाच मंदिरे, पाच रेल्वे स्थानके असा होतो. हा ट्रेलर आहे, पूर्ण चित्रपट अजून यायचा आहे, असे त्यात नमूद होते. त्याने २८ ऑक्टोबरपर्यंत फडणवीस यांच्याशी भेट करून देण्याबाबतदेखील लिहिले होते. गुरुवारी दुपारी विशेष शाखेतील पोलिसांनी जगदीश उईकेला ताब्यात घेतले. सायबर सेल तसेच पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी जगदीशची कसून चौकशी केली. मात्र, जगदीशने उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात उपायुक्त लोहित मतानी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दिल्लीत होता जगदीश?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश उईके हा मागील दोन आठवड्यांपासून दिल्लीत होता. तेथून तो नागपुरात पोहोचल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.