जय जयकारा... साथी देना साथ हमारा; कैलाश खेरच्या स्वरांनी भेदले नागपूरचे आसमंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 10:03 PM2021-12-18T22:03:01+5:302021-12-18T22:03:32+5:30
Nagpur News कैलाश खेरने शिवतांडवाच्या संगतीने सादर केलेले त्याचे आणि रसिकांचे आवडते गीत... जय जयकारा, जय जयकारा, साथी दे ना साथ हमारा... नागपूरकरांच्या रसिकतेला भेदणारे ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरची हिवाळ्यातील प्रसिद्ध अशी गुलाबी संध्याकाळ, गारठ्याची जाणिव करवून देणारा लहरता मंद वारा... संगतीला पौर्णिमेचा चंद्र आणि त्यात महादेवाचा निस्सिम भक्त असलेल्या कैलाश खेरने शिवतांडवाच्या संगतीने सादर केलेले त्याचे आणि रसिकांचे आवडते गीत... जय जयकारा, जय जयकारा, साथी दे ना साथ हमारा... नागपूरकरांच्या रसिकतेला भेदणारे ठरले. आपण गात असलेली शैली ही सुफी असल्याची जाणीव संगीत रसिकांनी करवून दिल्यावर, आपल्या त्याच शैलीने मनामनात स्थायिक झालेल्या पद्मश्री कैलाश खेर यांच्या गायनाचा साक्षात्कार घेण्यासाठी हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात तुफान गर्दी उसळली होती.
शनिवारी चौथ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन महोत्सवाचे प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह जिल्हाधिकारी आर. विमला, एअर मार्शल शिरीष देव, मेजर जनरल अनिल बाम, मेजर शिल्पा खडतकर, कॅप्टन वीरसेन तांबे व खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यानंतर पद्मश्री कैलाश खेर यांचे रंगमंचावर आगमन झाले आणि रसिकांना संगीताच्या आत्मिक प्रवासात घेऊन जाणाऱ्या सुफियाना स्वरांचा वर्षाव झाला. तौबा तौबा वे तेरी सुरत, तेरे बिन नहीं लगदा दिली मेरा ढोलना, शिवतांडव-जय जयकारा, डालो ना रंग, पिया घर आयेंगे, या रब्बा, चकदे फट्टे, मेरी दिवानी अशी अनेक लोकप्रिय गाणी सादर करून कैलाश खेर यांनी नागपूरकरांनी गुलाबी थंडीत स्वरांची ऊब दिली.
यावेळी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पाण्डेय, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळ कुळकर्णी, संजय गुळकरी, रेणुका देशकर, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांच्यासह आरजे मोना व आमोघ यांनी केले.
नागपूर यह भोले की नगरी
गाणी सादर करताना पद्मश्री कैलाश खेर यांनी मधामधात नागपूरकरांशी संवादही साधला. नागपूर हे परमात्मा महाशिव भोलेची नगरी असून, येथून उत्तरेकडे उज्जैन, ओंकारेश्वर ते दक्षिणेकडे त्र्यंबकेश्वर असा सर्वत्र शिवतत्त्वाचा वास झाला आहे. नितीन गडकरी हे महादेवाचे प्रिय भक्त असल्याचे खेर यावेळी म्हणाले आणि नितीन गडकरी व कांचन गडकरी यांना लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा दिल्या.
-----------
.........