नागपूरची शान असलेल्या जार्ई वाघिणीचे दीर्घ आजाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:08 PM2018-03-29T13:08:47+5:302018-03-29T13:10:27+5:30
नागपुरातील पर्यटनस्थळांच्या यादीत अग्रणी असलेल्या महाराज बागेचे भूषण असलेल्या जाई वाघिणीचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ती गेल्या सहा महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपुरातील पर्यटनस्थळांच्या यादीत अग्रणी असलेल्या महाराज बागेचे भूषण असलेल्या जाई वाघिणीचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ती गेल्या सहा महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होती. तिच्यावर सुरु असलेल्या उपचारांनीही तिला आराम पडलेला नव्हता. ती १० वर्षांची होती.
८ नोव्हेंबर २००८ साली चंद्रपूरहून जाई आणि जुई या दोन वाघिणी महाराजबागेत आणण्यात आल्या होत्या. या दोन वाघिणींना पहायला दररोज शेकडो नागरिक या प्राणी संग्रहालयाला भेट देत होते. लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही या दोन्ही वाघिणी पाहण्याची उत्सुकता असायची.
२००८ ते २०१७ या कालखंडात या दोन वाघिणी महाराज बागेची शान होत्या. २०१७ च्या नोव्हेंबर महिन्यात जुई वाघिणीचे निधन झाल्यानंतर जाई एकटी पडली होती. काही काळापासून तिला मूत्रपिंडाचा विकार जडला होता. तशातच तिला एकदा सापही चावला होता. या सगळ््या आघातातून ती मार्च महिन्यात थोडीफार सावरली होती. मात्र काही दिवसापासून तिची प्रकृती बिघडत गेली होती. तिचे खाणेपिणेही कमी झाले होते. अखेरीस बुधवारी रात्री तिची प्रकृती अधिकच बिघडत गेली आणि गुरुवारी पहाटे ५ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. जाईवर गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिच्या निधनाने नागपुरातील बालगोपाल व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.