कारागृहामधील कैदी झाले पदवीधर; इग्नू पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्राचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2023 08:04 PM2023-05-04T20:04:37+5:302023-05-04T20:05:09+5:30
Nagpur News नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाने कैद्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये कारागृहातील कैद्यांनी बी. ए., एम. ए., एम. बी. ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली.
नागपूर : विविध गुन्ह्यातील कैद्यांमध्ये सुधारणा घडवून त्यांना उत्तम नागरिक म्हणून समाजात पुन्हा कसे पाठवता येईल, यासाठी कारागृहाची भूमिका महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाने कैद्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये कारागृहातील बंद्यांनी बी. ए., एम. ए., एम. बी. ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विदयापीठ, दिल्ली यांच्या वतीने सन २००९ पासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात विशेष अभ्यासकेंद्राची स्थापना करण्यात आली. या अभ्यासकेंद्राच्यावतीने बी. ए., एम. ए. (समाजशास्त्र), एम. ए. (राज्यशास्त्र), एम. ए. (इंग्रजी) व एम. बी. ए. या अभ्यासक्रमांना बंद्यांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये सहा शिक्षा बंद्यांनी बी. ए. पदवी प्राप्त केली. दोन बंद्यांनी एम. ए.ची पदवी, तर एका बंद्याने एम. बी. ए. डिप्लोमा पदवी प्राप्त केली. या बंद्यांचा पदवी वितरण कार्यक्रम गुरुवारी कारागृहात पार पडला. यावेळी मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव वाळके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. शाम कोरेटी यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. आर. बी. ठाकरे होते.
उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. वाळके यांनी केले. शिक्षणातून आपला उत्कर्ष साधावा, असे मार्गदर्शन डॉ. कोरेटी यांनी केले. पदवी वितरण कार्यक्रमाचे आयोजक इग्णू नागपूरचे विभागीय संचालक डॉ. पी. शिवस्वरूप होते. कार्यक्रमाला कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे, उपअधीक्षक दीपा आगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नरेंद्रकुमार अहिरे, दयावंत काळबांडे, राजेश वासनिक आदी उपस्थित होते. संचालन कारागृह शिक्षक लक्ष्मण साळवे यांनी केले. यावेळी इतर कारागृह अधिकारी व कर्मचारी हजर होते.