मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांचे जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:30 AM2017-10-06T01:30:04+5:302017-10-06T01:30:15+5:30
मानधन वाढीसाठी ११ सप्टेंबरपासून आंदोलन करीत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी गुरुवारी जेलभरो करीत, प्रशासनाला चांगलेच जेरीस आणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानधन वाढीसाठी ११ सप्टेंबरपासून आंदोलन करीत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी गुरुवारी जेलभरो करीत, प्रशासनाला चांगलेच जेरीस आणले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तब्बल तीन तास संविधान चौक चौफेर घेरून धरला. जेलभरो दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा पुतळा जाळण्यात आला. पोलिसांशी बाचाबाची, धक्काबुक्की झाल्यानंतर ३२२४ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
वाढलेली महागाई लक्षात घेता आणि शासनाने दिलेल्या जबाबदाºया बघता अंगणवाडी सेविकांना १०,५०० व मदतनीस यांना ८,५०० रुपये मानधन मिळावे या मागणीसाठी संविधान चौकात अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील संपूर्ण अंगणवाड्या बंद असून, ० ते ६ वयोगटातील बालकांचा पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण, गरोदर व स्तनदा मातांची काळजी, किशोरवयीन मुलींना पोषक आहार आदी ठप्प पडला आहे. जिल्ह्यातील जवळपास ६० हजार बालके आंदोलनामुळे अंगणवाडीच्या लाभापासून वंचित आहे. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामुळे शासन आणि प्रशासन सुद्धा जेरीस आले आहे. कालपर्यंत शांततेत सुरू असलेले आंदोलन गुरुवारी काहिसे आक्रमक झाले होते. सकाळी ११.३० च्या सुमारास मोठ्या संख्येने महिला संविधान चौकात जमल्या होत्या. राज्यभरात जेलभरोचा इशारा दिल्याने महिलांनी संविधान चौकाला साखळी करून घेरले. मंत्री आणि सरकार विरोधात जोरदार घोषणांनी अख्खा परिसर दणाणला होता. त्यातच पंकजा मुंडे यांचा पुतळाही आंदोलकर्त्यांनी जाळल्याने पोलीस अािण आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ तणावसुद्धा झाला होता. तब्बल तीन तास रस्ता रोखून धरल्यानंतर पोलिसांनी ५० पेक्षा जास्त वाहनांमध्ये आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस लाईन टाकळी येथे नेले. तिथे आंदोलनकर्त्यांनी सभा घेऊन शासनाचा निषेध केला. शासन जोपर्यंत मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकर्त्यांनी दिला आहे. सोमवारपासून पुन्हा संविधान चौकात ठिय्या मांडणार असल्याचे आंदोलनाचे नेतृत्वकर्ते शाम काळे यांनी सांगितले.
या आंदोलनात ज्योती अंडरसहारे, वनिता कापसे, प्रीती राऊळकर, मनिषा गजभिये, अनिता गजभिये, चंद्रप्रभा राजपुते, जयश्री चहांदे, चंदा मेंढे, माधुरी जामगडे, दिलीप देशपांडे यांनी नेतृत्व केले.
प्रशासनाचा कारवाईचा इशारा
राज्यात पहिल्यांदाच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ३० टक्के इतकी भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी आपल्या ठिकाणी रुजू व्हावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा जि.प. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी दिला. ते म्हणाले की, जिल्ह्यात सध्या ३६ अंगणवाडी सेविका व मदतनीस रुजू झाल्या आहेत. आंदोलनामुळे बालकांवर अन्याय होत आहे. त्यासाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. बालकांना पोषण आहार पुरविण्यासाठी ग्रामसेवक, महिला बचत गट अथवा गावातील महिलांना नियुक्त करण्यात येईल. महिलांना पोषण आहारासाठी १६० रुपये मानधन व प्रती मुलगा ६ रुपये आहार खर्च देण्यात येणार आहे.