बलात्कारप्रकरणी तरुणास कारावास
By admin | Published: January 1, 2015 01:24 AM2015-01-01T01:24:28+5:302015-01-01T01:24:28+5:30
भरदुपारी घरात घुसून एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची
न्यायालय : दंडाच्या रकमेतील १० हजार पीडित मुलीला देण्याचा आदेश
नागपूर : भरदुपारी घरात घुसून एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील १० हजार रुपये आरोपीने पीडित मुलीला द्यावे, असा आदेशही न्यायालयाने दिला. राजेश राजू साखरे (२०), असे आरोपीचे नाव असून तो गरोबा मैदान कापसे चौक येथील रहिवासी आहे. ही दुर्दैवी घटना ८ मार्च २०१३ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली होती. पीडित मुलगी आपल्या घरात एकटीच असताना आरोपी साळसूदपणे घरात घुसला होता. त्याने दार आतून बंद करून बलात्कार केला होता. पीडित मुलीचा भाऊ घरी परत येताच आतून दार बंद होते. त्याने दार ठोठावताच आरोपीने दार उघडून त्याला हिसका मारून पळ काढला होता. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी भादंविच्या ३७६ (२)(एच)(एम), ४५२ आणि लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक बी. एन. शेंडे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील माधुरी मोटघरे तर आरोपीच्यावतीने अॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अॅड. पराग उके यांनी काम पाहिले. सहायक फौजदार लीलाधर वरठी आणि नायक पोलीस शिपाई आशिष कोल्हे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)