जैन समाज संख्येत कमी पण प्रभावशाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:39 AM2018-03-30T00:39:39+5:302018-03-30T00:39:51+5:30
जैन समाज संख्येने कमी आहे, पण भगवान महावीर यांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गावर चालणारा जैन समाज अत्यंत प्रभावशाली असल्याचे मत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जैन समाज संख्येने कमी आहे, पण भगवान महावीर यांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गावर चालणारा जैन समाज अत्यंत प्रभावशाली असल्याचे मत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले.
श्री जैन सेवा मंडळ, इतवारीच्यावतीने महावीर जयंतीनिमित्त महावीरनगर येथील महावीर उद्यानात गुरुवारी सायंकाळी आयोजित करण कोठारी ज्वेलर्स अहिंसा अवॉर्ड वितरण समारंभात मुख्य अतिथी म्हणून स्वामी बोलत होते. व्यासपीठावर श्री जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष सतीश पेंढारी, आ. सुधाकर कोहळे, नगरसेविका आभा पांडे, तीर्थरक्षा समितीचे राष्टÑीय मंत्री संतोष पेंढारी, करण कोठारी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र कोठारी, मंडळाचे महामंत्री पीयूष शाह, दिलीप पेंढारी, अवॉर्ड कमिटीचे मुख्य संयोजक निखिल कुसुमगर उपस्थित होते.
अहिंसेचा मार्ग सर्वश्रेष्ठ
स्वामी म्हणाले, अहिंसेचा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. आपसातील व्यवहार अहिंसेने व्हावेत. याचा अर्थ असा नव्हे की बाहेरील क्रूरता आणि आक्रमणापुढे नतमस्तक व्हावे. अशा स्थितीत उत्तर देण्याची शक्ती आमच्यात असावी. देशावर हजारो वर्षांपासून बाहेरून आक्रमण झाले आहे. त्याचा सामना एकजुटीने केल्यामुळेच आज ८२ टक्क्यांपेक्षा जास्त धार्मिक परंपरा आणि संस्कृती कायम आहेत. त्याचा अवलंब इंडोनिशिया, बँकॉकपासून कंबोडियापर्यंत केला आहे. देशातील तरुण पिढीला प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक व पारंपरिक वारसा अवगत करून देण्याची गरज आहे. स्वामी म्हणाले, ‘संस्कृत’ला देशाची राजभाषा बनविल्यास देश एकसंघ होईल. तसेच काळानुसार इतिहासाच्या पुस्तकांमध्ये बदल आवश्यक आहे. देशातील सर्व लोकांचा डीएनए एकसमान असून सर्वांनी एकजुटीने कुटुंबासारखे राहावे.
प्रारंभी डॉ. स्वामी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि त्यांच्या हस्ते जैन समाजातील बंधूंना सात वर्गवारीत कोठारी ज्वेलर्स अहिंसा अवॉर्ड प्रदान करण्यात आले. या वेळी रॅम्प शो आणि लघुनाटिका सादर करण्यात आली. प्रास्ताविक भाषण सतीश पेंढारी यांनी केले. संचालन निखिल कुसुमगर आणि आभार पीयूष शाह यांनी मानले. यावेळी महेंद्र कटारिया, अतुल कोटेचा, रिचा जैन यांच्यासह जैन समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सात श्रेणीत प्रदान केले अहिंसा अवॉर्ड
- प्रियल प्रियेश डोणगांवकर : लिटिल चॅम्प अवॉर्ड
- प्रेम मिलिंद जैन : गुणवंत युवा अवॉर्ड
- अमित कुमार जैन : गुणवंत व्यक्तित्त्व अवॉर्ड
- कन्हैयालाल धालावत : धार्मिक श्रावक अवॉर्ड
- अरुणा बेन मोदी : धार्मिक श्राविका अवॉर्ड
- अॅड. स्मिता सिंगलकर : समाजसेवा अवॉर्ड
- स्व. रवींद्र आगे्रकर : लाईफ टाइम अॅचिव्हमेंट अवॉर्ड