जैन मायनॉरिटी फेडरेशनने शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा प्रसार करावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:11+5:302021-02-10T04:08:11+5:30
नागपूर : अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने केंद्र व राज्य सरकारांच्या अल्पसंख्याक योजनांच्या प्रसारासाठी सुरू केलेले जनजागरण अभियान उपयुक्त ...
नागपूर : अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने केंद्र व राज्य सरकारांच्या अल्पसंख्याक योजनांच्या प्रसारासाठी सुरू केलेले जनजागरण अभियान उपयुक्त असून, या प्रचार अभियानाची व्याप्ती छोट्या-छोट्या गावापर्यंत तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वाढवावी, अशी अपेक्षा सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या अल्पसंख्याक योजना व आर्थिक आधारावरील आरक्षणाच्या योजनांच्या माहितीसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय जनजागरण अभियानाच्या महाराष्ट्रातील शुभारंभानिमित्त लोगोचे दर्डा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या मार्गदर्शक मंडळाचे प्रमुख विजय दर्डा यांना गेल्या वर्षभरातील कामकाजाचा अहवाल सादर करण्यासाठी, तसेच येत्या वर्षातील नवीन उपक्रमांची माहिती देण्यासाठी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी यवतमाळ हाऊस, नागपूर येथे विशेष बैठक आयोजित केली. तीत दर्डा यांच्याकडे कामकाजाचा अहवाल सादर करण्यात आला. फेडरेशनतर्फे शालेय स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये जैन समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला असल्याची माहिती दिली.
तसेच केंद्र व राज्य सरकारतर्फे युवक व महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना प्रभावीपणे सुरू असल्याचे सांगितले. त्याचबरोबर युवकांना नवीन व्यापारासाठी उपलब्ध असलेल्या कर्जाच्या योजना, विदेशी शिक्षणासाठी असलेले कर्ज, अनुदानाच्या योजना या क्षेत्रातील केलेल्या कामाचा विस्तृत अहवाल सादर केला.
केंद्र सरकारतर्फे ‘हमारी धरोहर’ या नावाने प्राचीन जैन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी तसेच प्राचीन जैन ग्रंथांचे पुनर्लेखन यासाठी सुरू असलेल्या योजनेमध्ये समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी अधिक कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांसाठी समाजभवन निर्माण करणे, शिक्षणाच्या सुविधा वाढविण्यासाठी नवीन शिक्षण संस्थांची उभारणी करण्यासाठी असलेल्या योजना समाजापर्यंत पोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले. दर्डा यांनी जनगणना-२०२१ योग्य पद्धतीने समाजापर्यंत पोहोचेल यासाठी बारकाईने लक्ष देण्याची सूचना केली. तसेच केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या आर्थिक आधारावरील आरक्षणाची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचे सांगून, या आरक्षणामुळे जैन समाजातील पात्र घटक शिक्षणामध्ये व नोकऱ्यांमध्ये आपला अधिकार मिळवू शकतील, असे सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत फेडरेशनचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, उज्ज्वल पगारिया, अनिल पारख, संतोष पेंढारी, अतुल कोटेचा, निखिल कुसुमगर, नरेश पाटणी. डॉ. रिचा जैन, सुनील जैन, विनय आकुलवार यांनी सहभाग घेतला.
जनगणनेत ‘जैन’ एवढाच उल्लेख करा
- जनगणना-२०२१ मध्ये कुटुंबाची माहिती भरताना धर्म व जात या दोन्ही रकान्यांमध्ये जैन धर्मातील लोकांनी आपले गोत्र, उपजाती, पंथ, संप्रदायांचा उल्लेख न करता फक्त ‘जैन’ एवढाच उल्लेख करावा. ज्यामुळे जैन समाजाची खरी संख्या अधिकृतपणे सरकार दप्तरी नोंद होईल. सध्या भारतात जैन समाजाची एकूण संख्या दोन कोटीं पेक्षा अधिक असली तरीही सरकारच्या जनगणनेच्या रेकॉर्डमध्ये फक्त ४५ लाख इतकीच नोंद आहे. ही नोंद दुरुस्त होणे आवश्यक असल्याने या बाबतीत समाजातल्या सर्वच घटकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन ललित गांधी यांनी यावेळी केले.