जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याची नागपुरातून पुलवामाला रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 08:00 AM2022-06-07T08:00:00+5:302022-06-07T08:00:06+5:30
Nagpur News जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा जम्मू-काश्मिरातील हस्तक रईस अहमद शेख असदउल्ला शेख याला नागपूर कारागृहातून पुलवामा(जम्मू-काश्मीर)ला हलविण्यात आले आहे.
नरेश डोंगरे
नागपूर - जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा जम्मू-काश्मिरातील हस्तक रईस अहमद शेख असदउल्ला शेख याला नागपूर कारागृहातून पुलवामा(जम्मू-काश्मीर)ला हलविण्यात आले आहे. रईसने गेल्या वर्षी नागपुरात तीन दिवस मुक्काम ठोकून संघ मुख्यालयाची रेकी करून एकच खळबळ उडवून दिली होती. त्याला येथून काश्मिरात नेण्याची घडामोड सशस्त्र सुरक्षा जवानांच्या गराड्यात झाली. प्रचंड संवेदनशील विषय असल्याने या घडामोडीची कुणाला साधी कुणकुणही लागू देण्यात आली नाही.
जैश ए मोहम्मदचा पाकिस्तानमधील म्होरक्या उमर याने पुलवामाच्या अवंतीपुरा येथील त्याचा हस्तक रईस अहमद शेख याला संघ मुख्यालयाच्या रेकीचे काम सोपविले होते. त्यानुसार, रईस १३ जुलै २०२१ ला नागपुरात आला. एका हॉटेलमध्ये तीन दिवस मुक्काम केल्यानंतर १५ जुलैला तो नागपूरहून जम्मू-काश्मीरमध्ये निघून गेला. काही दिवसानंतर पुलवामातील सुरक्षा यंत्रणांनी रईसला अटक केली. त्याच्याजवळ हॅण्डग्रेनेडसह अन्य घातक शस्त्रेही होती. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात ‘आपण जैशचा म्होरक्या उमर याच्या सांगण्यावरून नागपूरला गेलो होतो. तेथे तीन दिवस मुक्काम करून संघ मुख्यालयासह अन्य काही संवेदनशील स्थळाची रेकी केली. तेथील फोटो आणि व्हिडीओही आपण उमरला पाठविले’, अशी धक्कादायक माहिती दिली. ही माहिती काश्मिरातील अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांना कळविली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात एक पथक काश्मीरला पोहोचले. तेथील तपास यंत्रणांच्या शीर्षस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या माहितीच्या आधारे नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा प्रकार दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आला. प्रदीर्घ चाैकशी अन् कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एटीएसच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी रईसला मेच्या दुसऱ्या आठवड्यात पुलवामा कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला नागपुरात आणून दोन ते तीन दिवस चाैकशी केल्यानंतर १७ मे रोजी रईसला नागपूरच्या कारागृहात डांबले.
कैदी नंबर ३४४३
नागपूर कारागृहात रईसला कैदी नंबर ३४४३ देण्यात आला. येथे त्याला अतिसुरक्षा विभागात ठेवण्यात आले होते. २३ तारखेला त्याची ओळखपरेड घेण्यात आली. त्यानंतर दोन आठवडे नागपूर कारागृहात भत्ता घेतल्यानंतर तीन ते चार दिवसापूर्वी रईसला एटीएसच्या पथकाने पुन्हा ताब्यात घेतले. त्याची सशस्त्र जवानांच्या गराड्यात पुलवामा कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती खास सूत्रांनी लोकमतला दिली.
अधिकाऱ्यांचे माैन
रईसला नागपुरात आणले तेव्हाही प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. आता परत नेले त्याहीवेळेला कुणाला कानोकान खबर होणार नाही, याची खास खबरदारी घेण्यात आली. विशेष म्हणजे, या घडामोडींबाबत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनभिज्ञता दर्शवीत माैन बाळगले. कारागृहातील सूत्रांनीही यासंबंधाने फारशी माहिती नसल्याचे म्हटले, हे विशेष ।
----