जैशच्या दहशतवाद्याचा तीन दिवस होता नागपुरात मुक्काम; विमानाने आला अन् परतही गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 07:00 AM2022-01-08T07:00:00+5:302022-01-08T07:00:08+5:30
Nagpur News जैशसाठी काम करणारा २६ वर्षीय स्लिपर सप्टेंबर २०२१ मध्ये विमानाने नागपुरात आला होता. सेंट्रल एव्हेन्यूवरच्या एका हॉटेलमध्ये तो मुक्कामी थांबला होता. त्याने संघ मुख्यालय, रेशीमबाग ग्राउंड परिसरात जाऊन फोटो आणि व्हिडिओग्राफी केली.
नरेश डोंगरे
नागपूर : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने नागपुरातील संघ मुख्यालयाची रेकी करून घेतल्याचे उघड झाल्यानंतर तपास यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेकी करणाऱ्याचा ज्यांच्या ज्यांच्याशी संपर्क आला त्या सर्वांचीच पोलिसांनी आता कसून चाैकशी चालवली आहे.
खास सूत्रांच्या माहितीनुसार, जैशसाठी काम करणारा २६ वर्षीय स्लिपर सप्टेंबर २०२१ मध्ये विमानाने नागपुरात आला होता. सेंट्रल एव्हेन्यूवरच्या एका हॉटेलमध्ये तो तब्बल तीन दिवस मुक्कामी थांबला होता. या तीन दिवसांत त्याने संघ मुख्यालय, रेशीमबाग ग्राउंड परिसरात जाऊन फोटो आणि व्हिडिओग्राफी केली. हे फोटो अन् व्हिडिओ त्याने जैशच्या दहशतवाद्यांना पाठविले. या तीन दिवसांत त्याने जैशच्या म्होरक्यासह अनेक दहशतवाद्यांशी फोनवरून संपर्क केल्याचीही माहिती आहे.
विमानतळाचीही रेकी
नागपुरात येताना आणि परत जाताना त्याने आणखी काही संवेदनशील स्थळांसह येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही रेकी केली आहे. तेथील फुटेजही पोलिसांनी मिळवले आहेत.
कानोकान खबर नाही
विशेष म्हणजे, जैशच्या म्होरक्यांनी पाकिस्तानमध्ये बसून संघ मुख्यालयासह अन्य काही स्थानांची रेकी करून घेतली असली तरी पाच महिने त्याची गुप्तचर यंत्रणांना कानोकान खबर लागली नाही. दहशतवादी कारवायात हा स्लिपर श्रीनगरमध्ये पकडला गेला अन् नंतर नागपुरात रेकी झाल्याचे वृत्त बाहेर आले. त्यासंबंधाने अधिक माहिती मिळवण्यासाठी शहर पोलिसांचे एक पथक श्रीनगरमध्ये जाऊन आले. उजळ माथ्याने थेट विमानाने नागपुरात येऊन हॉटेलमध्ये राहिलेला हा स्लिपर कोण, कुठला, त्याची सर्वच माहिती नागपूर पोलिसांनी मिळवली आहे.
कनेक्टिंग पीपल्सचा शोध
ज्या हॉटेलमध्ये तो मुक्कामी होता, त्या हॉटेलचे चालक, मालक अन् नोकरांचीही पोलिसांनी कसून चाैकशी केली आहे. तो येथे कुण्या वाहनातून आला, गेला ते सर्व तपासले जात असून, त्याला कुणी मदत केली का, त्याचे येथे ‘कनेक्टिंग पीपल्स’ आहेत का, त्याचीही पोलीस चाैकशी करीत आहेत.
योग्य वेळी सर्व उघड करू - पोलीस आयुक्त
प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंबंधाने फारसे बोलण्याचे टाळले आहे. योग्य वेळी सर्व माहिती उघड केली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटले आहे.