जलालखेडा येथे कोरोनाबाधितांचा टक्का घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:09 AM2021-03-16T04:09:30+5:302021-03-16T04:09:30+5:30
जलालखेडा : मार्चच्या पहिल्या आठवड्यात संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढल्याने जलालखेडा येथे रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली होती. येथे रोज १० ...
जलालखेडा : मार्चच्या पहिल्या आठवड्यात संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढल्याने जलालखेडा येथे रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली होती. येथे रोज १० ते १५ रुग्णांची नोंद होत होती. मात्र, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभागाने आखलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनामुळे जलालखेडा येथे रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. येथे गेल्या आठवड्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. जलालखेडा येथे रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने येथे तीनदिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. ग्रामस्थांनी यास प्रतिसाद दिला. जलालखेडा येथील संक्रमण रोखण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामस्थांच्या कोरोना चाचणीवर भर दिला. लसीकरण मोहिमेबाबत घरोघरी जनजागृती केली. यासोबतच गावात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली. या त्रिसूत्रीमुळे जलालखेडा येथील स्थितीत सुधारणा झाली आहे. आजही जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांची तातडीने चाचणी केली आहे. यासोबतच संबंधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे लगेच गृह विलगीकरण करण्यात येत आहे. यासोबत येथील केंद्रावर रोज सरासरी १०० ते १४० ज्येष्ठ नागरिक, फ्रंट लाइन वर्कर, ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांना कोविड लस दिली जात आहे. इकडे गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कोणतेही भीती न बाळगता तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वैखंडे व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.