बोखाऱ्यात फटाक्यामुळे जलजीवन मिशनच्या पाइचा उडाला भडका, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 11:29 AM2023-11-15T11:29:47+5:302023-11-15T11:31:52+5:30

गोडाऊनला लागली आग : कोट्यवधी रुपयांचे पाइप जळून खाक

Jaljeevan Mission pyre burst into flames due to firecrackers in Bokhara, loss of crores of rupees | बोखाऱ्यात फटाक्यामुळे जलजीवन मिशनच्या पाइचा उडाला भडका, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

बोखाऱ्यात फटाक्यामुळे जलजीवन मिशनच्या पाइचा उडाला भडका, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

कोराडी (नागपूर) : बोखारा ग्रामपंचायतीत जलजीवन मिशनअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी कंत्राटदाराने एचडीपीई पाइप (प्लास्टिक) आणून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका गोडाऊनमध्ये ठेवले होते. या गोडाऊनला मंगळवारी दुपारी १२:४५ वाजताच्या सुमारास आग लागली. यात कोट्यवधी रुपयांचे पाइप जळून खाक झाले. फटाक्यामुळे ही आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना बोखाऱ्यात आहे. परंतु ती पुरेशी नसल्याने जलजीवन मिशनअंतर्गत जलवाहिनीचे नेटवर्क बोखारा ग्रामपंचायतीच्या हद्दीत टाकण्यात येत आहे. ५४ कोटी रुपयांच्या या योजनेची जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाली आहेत. त्यासाठी एचडीपीई पाइप वापरण्यात येत आहेत. हे काम प्रिथिपाल सिंग ॲण्ड कंपनीला देण्यात आले आहे. बोखारा ग्रामपंचायतच्या हद्दीत ग्रामपंचायतपासून काही अंतरावर जुने बांधकाम असलेले गोडाऊन आहे. या गोडाऊनला खिडक्या दरवाजे नाहीत. गोडाऊनमध्ये कंत्राटदाराने एचडीपीई पाइपचा साठा ठेवला होता. फटाक्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाइप प्लास्टिकचे असल्याने आगीने चांगलाच भडका घेतला.

गोडाऊन लगत शॉपिंग कॉम्प्लेक्स

या गोडाऊनच्या मागच्या भागाला शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. येथे १० दुकाने आहेत. सुदैवाने आगीची कुठलीही झळ दुकानांना बसली नाही.

तीन तासांनी आली आग नियंत्रणात

घटनेची माहिती सरपंच भाऊराव गोमासे यांनी महादुला नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाला दिली. सर्वात आधी महादुला नगरपंचायत अग्निशमन विभागाची गाडी दाखल झाली. यानंतर काही वेळात खापरखेडा व कोराडी वीज केंद्रातील अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले. तीन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.

मदतीला ग्रामस्थ धावले

ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र खोटे, उज्ज्वल सोनवणे, ईशान कुर्वे, उपसरपंच वहीद खान, शकील सुलेमान, कृष्णा कुदावळे, सनी आवळे, संदीप आढावू आदी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. सर्वांनी आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली.

Web Title: Jaljeevan Mission pyre burst into flames due to firecrackers in Bokhara, loss of crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.