नितीन गडकरी यांच्या घरी जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 08:09 PM2019-05-23T20:09:33+5:302019-05-23T20:16:40+5:30
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. या विजयाचे शिलेदार म्हणून नितीन गडकरी यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी हा विजय जल्लोषात साजरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. या विजयाचे शिलेदार म्हणून नितीन गडकरी यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी हा विजय जल्लोषात साजरा केला.
सकाळपासून देशभरातील निकालाचे कल हाती येऊ लागले आणि भाजपा मोठ्या विजयाकडे वाटचाल करू लागली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आणि हे कार्यकर्ते गडकरी यांच्या घरी गोळा होऊ लागले. येथे निवासस्थानी मोठा स्क्रिन लावण्यात आला होता. येथे निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. सकाळी १० ते ११ वाजतापर्यंत देशातील चित्र जवळजवळ स्पष्ट झाले होते आणि भाजप व सहयोगी पक्षांना (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून आले तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आणि या परिसरात एकच जल्लोष सुरू झाला. हा उत्साह टिपण्यासाठी वर्तमानपत्र तसेच इलेक्ट्रानिक्स प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व कॅमेरामॅन यांनीही हजेरी लावली होती.
सकाळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, आमदार प्रा. अनिल सोले, भाजपा शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, अनिल बोंडे, महापौर नंदा जिचकार, नगरसेविका चेतना टांक, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी गडकरी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. शेफ विष्णू मनोहर, मैत्री परिवारचे चंदू पेंडके, विजय जत्थे, रवींद्र कासखेडीकर आदी चाहते व नातेवाईकांनीही घरी येऊन त्यांचे अभिनंदन केले. दुसरीकडे गडकरी यांचे चाहते व कार्यकर्त्यांच्या उत्साहाला जोम येऊ लागला. एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा देत जल्लोष सुरू झाला. यामध्ये भाजप समर्थिन विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा वाढत असतानाही कार्यकर्त्यांचा जोश शिगेला पोहचला होता. दुपारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या कार्यकर्त्यांची विजयी रॅली ढोलताशांसह वाजतगाजत-नाचत गडकरी वाड्यावर दाखल झाली. येथे आधीच तयार असलेल्या वाजंत्र्यांनीही सहभाग घेतला आणि जल्लोषाचा आवाज घुमू लागला. कार्यकर्त्यांनीही त्यावर फेर धरत विजय साजरा केला. गडकरी वाड्यावर उत्साहाचे हे चित्र दिवसभर सुरू होते.