जांबुवंतराव म्हणजे ‘विदर्भ’ होते
By admin | Published: March 11, 2017 02:48 AM2017-03-11T02:48:19+5:302017-03-11T02:48:19+5:30
विदर्भवीर जांबुवंतराव धोटे एक धाडसी आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व होते. त्यांना हिमालयाची उंची होती.
श्रद्घांजली सभा : श्रीहरी अणे यांचे गौरवोद्गार
नागपूर : विदर्भवीर जांबुवंतराव धोटे एक धाडसी आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व होते. त्यांना हिमालयाची उंची होती. त्यांनी स्वतंत्र विदर्भाची चळवळ सर्वोच्च शिखरावर पोहोचविली होती. त्यामुळेच जांबुवंतराव म्हणजे ‘विदर्भ’ अशी त्यांची ओळख होती, असे गौरवोद्गार राज्याचे माजी महाधिवक्ता तथा विदर्भ मिररचे संस्थापक अॅड़ श्रीहरी अणे यांनी काढले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि विदर्भ मिरर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी स्व. जांबुवंतराव धोटे यांना श्रद्घांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरू न ते बोलत होते. टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून माजी खासदार विलास मुत्तेमवार, आ. आशिष देशमुख, हरिभाऊ केदार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, अॅड़ वामनराव चटप, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़ अनिल किलोर, अॅड़ मुकेश समर्थ व विदर्भ माझा पक्षाचे प्रमुख राजकुमार तिरपुडे उपस्थित होते.
यावेळी गिरीश गांधी यांनी जांबुवंतराव धोटे यांच्याशी जुळलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत, विदर्भ चळवळीतील जांबुवंतराव धोटे यांच्या योगदानाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, जांबुवंतराव म्हणजे, एक वादळी व्यक्तिमत्त्व होते. ते स्वभावाने आक्रमक वाटत होते, मात्र मनाने तेवढेच हळवे सुद्धा होते. जांबुवंतराव म्हणजे, माणसांचा एक समूहच होता. ते ज्या गल्लीतून जात तेथे शेकडो लोक गोळा होत होते.
विदर्भाच्या आंदोलनात आता एवढा बहाद्दर नेता होणे नाही, असेही ते म्हणाले. हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़ अनिल किलोर यांनी आपण सर्वांनी वेगळ्या विदर्भाचा लढा मोठा केला, तर ती जांबुवंतराव धोटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. यावेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र यांनीही यांच्याशी जुळलेल्या आठवणींना उजाळा देत, श्रद्घांजली अर्पण केली. दरम्यान आ. आशिष देशमुख, हरिभाऊ केदार, उमेश चौबे, अॅड़ वामनराव चटप, अॅड़ मुकेश समर्थ, राजकुमार तिरपुडे, अॅड़ रवी संन्याल व सुनील चोखारे यांनीही मनोगत व्यक्त करून जांबुवंतराव यांना श्रद्घांजली वाहिली. या शोकसभेचे संचालन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी केले.(प्रतिनिधी)