नागपुरातील जामठा स्टेडियम भारतासाठी नेहमीच ‘लकी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:23 AM2019-03-05T10:23:47+5:302019-03-05T10:24:53+5:30
विदर्भ क्रिकेट संघटनेचे जामठा स्टेडियम भारतासाठी नेहमी ‘लकी’ ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेचे जामठा स्टेडियम भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमी ‘लकी’ ठरले. उभय संघांमध्ये आतापर्यंत येथे तीन एकदिवसीय खेळले गेले. तिन्ही सामन्यात यजमान संघाने बाजी मारली आहे. भारताने येथे पहिला सामना २८ ऑक्टोबर २००९ रोजी खेळला. नव्या मैदानावर हा पहिलाच सामना होता. तेव्हा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने १०७ चेंडूत १२४ धावा ठोकल्या होत्या व या जोरावर हा सामना भारताने ९९ धावांनी जिंकला होता. धोनीच्या खेळीच्या बळावर भारताने ७ बाद ३५४ धावा उभारल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला २५५ धावांत लोळविले होते.
उभय संघांमध्ये दुसरा सामना ३० आॅक्टोबर २०१३ रोजी खेळविण्यात आला. ऑस्ट्रेलियाने ६ बाद ३५० धावा केल्यानंतरही भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला. तत्कालीन कर्णधार जॉर्ज बेली(१५६) व शेन वॉटसन (१०२) यांच्या तडाख्यामुळे पाहुण्यांनी मोठी धावसंख्या उभारली. यानंतर शिखर धवन (१००) व विराट कोहली (नाबाद ११५) यांच्यामुळे भारताने सहजपणे बाजी मारली होता.
दोन्ही संघ १ ऑक्टोबर २०१७ रोजी तिसऱ्यांदा येथे पुरस्परांपुढे आले. भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करीत ९ बाद २४२ धावा केल्या. रोहित शर्माच्या १२५ व अजिंक्य रहाणेच्या ६१ धावांच्या जोरावर भारताने ४२.५ षटकात विजयी लक्ष्य गाठले होते. २०११ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने येथे न्यूझीलंडला २५ फेब्रुवारी २०११ रोजी ७ गडी राखून पराभूत केले होते.
लक्षवेधी...
व्हीसीएच्या जामठा मैदानावर महेंद्रसिंग धोनी हा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. त्याने येथे चार डावात दोन शतकांसह २६८ धावा ठोकल्या. त्यापैकी एक शतक २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध साजरे केले होते.
विराट कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी, वन डे अािण टी-२० अशा १५८ डावात ८९७८ धावा केल्या. नागपुरात त्याने ४४ धावा केल्यास कर्णधार म्हणून नऊ हजार धावा ठोकणारा तो पहिला खेळाडू बनेल. जामठा येथे हा विक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.