भारत-बांगलादेश सामन्यात जामठा स्टेडियम परिसर झाला ‘जाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 10:33 AM2019-11-11T10:33:50+5:302019-11-11T10:34:45+5:30
भारत आणि बांगलादेश दरम्यान रविवारी नागपुरातील जामठा स्टेडियमवर आयोजित एक दिवसीय क्रिकेट सामन्याला पाहण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांमुळे जामठा परिसर जाम झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भारत आणि बांगलादेश दरम्यान रविवारी नागपुरातील जामठा स्टेडियमवर आयोजित एक दिवसीय क्रिकेट सामन्याला पाहण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांमुळे जामठा परिसर जाम झाला होता. वर्धा मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. ती सुटायला बराच कालावधी जावा लागला. दोन पोलीस उपायुक्त, १८ पोलिस निरीक्षक, ५२ सहाय्यक निरीक्षक, ३९९ पोलिस पुरुष व ८१ महिला पोलिस यांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी होती. ही वाहतूक सुरळित व्हायला मध्यरात्र उजाडली होती.
रविवारी सायंकाळी ५ नंतर पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जामठ्यांकडे निघाल्याने वर्धा मार्ग वाहनांनी अक्षरश: फुलला होता. तर, एवढ्या मोठ्या संख्येतील वाहने वाहतुकीत अडसर निर्माण करू शकतात, हे ध्यानात घेऊन पोलिसांनी विशिष्ट टप्प्यांवर वाहने थांबवून टप्प्याटप्प्याने ती स्टेडियमकडे मार्गस्थ केल्याने वाहतुकीची कोंडी टळली.
भारत आणि बांगला देशदरम्यान रविवारी येथील जामठा स्टेडियमवर होणाऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यासाठी ५० हजार प्रेक्षक येण्याची अपेक्षा असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अर्धेअधिक क्रिकेट रसिक आपापल्या वाहनांनी स्टेडियमवर येतात, असा यापूर्वीचा अनुभव असून एकाच वेळी हजारो वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी होते. अपघाताची भीती वाढते. वाहतूक रखडल्यास रुग्ण घेऊन येणारी अॅम्ब्युलन्स अडकते, त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. हा एकूणच प्रकार लक्षात घेऊन वाहतुकीत होणारा अडसर टाळण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, पोलिसांनी अभ्यासपूर्ण नियोजन करून वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. सामना पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या पार्किंगची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग वगळता रस्त्यावर कुठे वाहने उभी केल्यास ती पोलीस उचलून नेतील. त्यासाठी पोलिसांनी क्रेनची व्यवस्था केली.
वाहतूक शाखेच्या ४५० कर्मचाºयांना वर्धा मार्गावर तैनात करण्यात आले. त्यांनी सामन्यादरम्यान जड वाहनांना दूरवर अडवून ठेवले. चिंचभूवन ते जामठा स्टेडियम या दरम्यानच्या विशिष्ट अंतरावर तीन ते पाच मिनिटांसाठी वाहने थांबवून टप्प्याटप्प्याने वाहने पुढे सोडली. सामना संपल्यानंतरही प्रत्येकाला घाई सुटते. त्यामुळे अपघाताची भीती असते.
अपघात झाल्यास वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांसाठी मार्ग खुला करण्यात आला. परिणामी काही मिनिटांचा अपवाद वगळता पहिल्यांदाच जाम लागला नाही, असा दावा रविवारी रात्री उशिरा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी लोकमतशी बोलताना केला.
पोलिसांचे परिश्रम फळाला !
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची सुरक्षा पोलिसांसाठी अत्यंत संवेदनशील विषय असतो. मात्र, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, अतिरिक्त आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त विवेक मासाळ, उपायुक्त चिन्मय पंडित यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने रविवारी दुपारी ३ वाजतापासून तो रात्री ११.५० पर्यंत परिश्रम घेतले. त्यामुळे कसलीही गडबड गोंधळ किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.