जनता कर्फ्यू : व्यापारी प्रतिष्ठाने बंद, रस्त्यावर नागरिकांची गर्दी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 08:39 PM2020-09-19T20:39:37+5:302020-09-19T20:41:58+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी शनिवार आणि रविवारी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी फार्मसी, डेअरी आणि काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता नागपुरातील सर्वच बाजारपेठांमधील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी शनिवार आणि रविवारी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी फार्मसी, डेअरी आणि काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता नागपुरातील सर्वच बाजारपेठांमधील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसली नाही. याशिवाय शनिवार २६ आणि रविवारी २७ सप्टेंबरलाही जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
नागपुरातील सर्व बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यूला सहकार्य करण्याचे आवाहन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केले आहे. व्यापारी आणि नागरिकांनी चेंबरच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, हे विशेष.
मेहाडिया म्हणाले, नागपुरात कोरोना संसर्गासोबत रुग्णांचीही संख्या वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी सप्टेंबर महिन्यात दोन शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यूमध्ये जनतेने स्वत:च्या रक्षणासाठी नियम आणि अटींचे पालन करायचे आहे. अत्यावश्यक असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावे. याशिवाय बाजारात गर्दी होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने दोन दिवस बंद ठेवावीत. व्यापारी निरोगी राहिल्यास पुढेही त्यांना कमविता येईल. याशिवाय स्वत:चे कुटुंब आणि कर्मचाºयांची काळजी घेण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. सध्या बाजारात नागरिकांची गर्दी वाढली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जनता कर्फ्यू हाच एकमेव उपाय आहे. त्याचे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पालन करावे.
होलसेल किराणा इतवारी, मस्कासाथ बाजारपेठा बंद
इतवारी होलसेल किराणा मार्केट असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह म्हणाले, असोसिएशनच्या निर्णयानुसार जनता कर्फ्यूमध्ये इतवारी आणि किराणा बाजारपेठा शनिवारी बंद होत्या. याशिवाय २६ आणि २७ सप्टेंबरलासुद्धा बाजारपेठा बंद राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे व्यापारी भयभीत आहेत. नियमित दिवसात व्यापारी सायंकाळी ७ च्या आत दुकाने बंद करीत आहेत. दुकानात कर्मचाºयांचीही संख्या कमी आहे. व्यापाºयांनी ग्राहकांना मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक केले आहे.
इतवारी सराफा बाजार बंद
नागपूर सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे व सचिव राजेश रोकडे म्हणाले, असोसिएशनच्या निर्णयानुसार इतवारी मुख्य सराफा बाजार आणि नागपुरातील सराफांची दुकाने बंद आहेत. कोरोनावर मात करण्याचा व्यापाऱ्यांचा मुख्य उद्देश आहे. जीव वाचला तर पुढेही व्यवसाय करू, असा व्यापाऱ्यांचा मूलमंत्र आहे. जनता कर्फ्यू व्यापारी आणि नागरिकांच्या हितासाठीच आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे.
होलसेल धान्य बाजार बंद
होलसेल धान्य बाजाराचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, कळमना आणि इतवारी येथील होलसेल धान्य बाजार जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला आहे. याशिवाय २६ आणि २७ सप्टेंबरला आयोजित जनता कर्फ्यूमध्येही बंद राहणार आहे. याशिवाय आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय कळमना होलसेल न्यू ग्रेन मार्केटने घेतला आहे.
गांधीबाग होलसेल क्लॉथ व यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान म्हणाले, गांधीबाग होलसेल क्लॉथ मार्केट २० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. असोसिएशनचे जनता कर्फ्यूला समर्थन आहे.