जानकर यांचा भाजपाचे उमेदवार होण्यास इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 09:27 PM2018-07-05T21:27:38+5:302018-07-05T21:47:52+5:30
नारायण राणे, विनायक मेटे यांच्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भाजपाचे उमेदवार या नात्याने विधान परिषदेवर जावे, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जानकर हे रासपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले व त्यांनी आपल्या पक्षातर्फे अर्ज दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नारायण राणे, विनायक मेटे यांच्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भाजपाचे उमेदवार या नात्याने विधान परिषदेवर जावे, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जानकर हे रासपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले व त्यांनी आपल्या पक्षातर्फे अर्ज दाखल केला. परिणामी, भाजपाचे पाचऐवजी चार उमेदवार रिंगणात आहेत. विधान परिषदेच्या ११ जागांकरिता १६ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपाच्या पृथ्वीराज देशमुख यांनी दाखल केलेला अतिरिक्त अर्ज ते मागे घेतील व सदस्यांची बिनविरोध निवड होईल, अशी अपेक्षा आहे.
यापूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांना भाजपाने आपल्या पक्षातर्फे विधान परिषदेवर धाडले. स्वाभिमानी पक्षाची स्थापना केलेले नारायण राणे यांनाही भाजपाने आपले उमेदवार म्हणून राज्यसभेवर पाठवले. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या निवडणुकीत महादेव जानकर यांनीही भाजपाच्यावतीने अर्ज दाखल करावा, याकरिता त्या पक्षाच्या नेत्यांचा आग्रह होता. मात्र जानकर यांनी त्याला नकार दिला. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आदी अनेक मंत्र्यांनी व भाजपा नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण भाजपाचे उमेदवार झालो तर पक्षाचे अस्तित्व संपून जाईल आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्यावेळी जागावाटपातील आपली वाटाघाटीची क्षमता संपुष्टात येईल, याची जाणीव असलेल्या जानकर यांनी त्याला साफ नकार दिला.
गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपातर्फे विद्यमान आमदार भाई गिरकर, नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील, अॅड. नीलय नाईक यांनी अर्ज दाखल केले. भाजपाचा पाचवा उमेदवार होण्यास जानकर यांनी नकार दिल्याने त्यांनी रासपातर्फे अर्ज भरला. भाजपाने पृथ्वीराज देशमुख यांचा अतिरिक्त अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसतर्फे शरद रणपिसे व यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसने बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवारी दिल्याने त्यांनीही अर्ज भरला. शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार अनिल परब व प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी अर्ज भरले. शेकापचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनीही अर्ज दाखल केला.
जानकर, शेट्टी यांचेच स्वतंत्र अस्तित्व
मागील विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यावर भाजपा-शिवसेनेसोबत असलेले सर्व छोटे पक्ष भाजपासोबत आले होते. या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व येत्या निवडणुकीत जागावाटपात डोकेदुखी ठरणार, हे लक्षात आल्याने छोट्या पक्षाच्या नेत्यांना भाजपातर्फे उमेदवारी देण्याची खेळी त्या पक्षाने खेळली. मात्र जानकर व स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनीच आपले स्वतंत्र अस्तित्व राखले. लोकसभा निवडणूक आपण कप-बशी या रासपाच्या निवडणूक चिन्हावर लढवली होती, याकडे लक्ष वेधत जानकर यांनी भाजपाचे उमेदवार होण्यास नकार दिला. रासपाच्या राज्यातील २७ जिल्ह्यांत कार्यकारिणी आहे. राज्यात ९७ नगरसेवक व जि.प. सदस्य आहेत. चार नगराध्यक्ष व तीन पंचायत समिती सभापती आहेत. कर्नाटकातील महापालिकेत सदस्य असून, आसाम, गुजरात या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य आहेत. त्यामुळे भाजपाचे उमेदवार झाल्यास पक्षाचे खच्चीकरण होईल, असा युक्तिवाद जानकर यांनी केला.
रासपा हा छोटा पक्ष असून भाजपासारख्या मोठ्या पक्षाने मला कवेत घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे भाऊ असून, त्यांनी मित्रपक्षाचा सन्मान राखल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. नारायण राणे यांच्या पक्षाची नोंदणी झालेली नव्हती तर विनायक मेटे यांनी भाजपाच्या चिन्हावरच सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय निर्णयाशी माझ्या निर्णयाची तुलना अयोग्य आहे.
महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री व रासपा नेते.