Jara hatke : २० वर्षीय युवकाला ५२ दात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 07:58 PM2019-12-31T19:58:09+5:302019-12-31T20:00:22+5:30
निसर्गाने मानवाची रचना करताना, त्याला ३२ दातांचे वरदान दिले आहे. जन्मानंतर वयाच्या १८ वर्षापर्यंत ३२ दातांची निर्मिती टप्प्याटप्प्याने होत असते. पण कोहिनूर नाडे या २० वर्षीय युवकाला निसर्गाने ५२ दातांचे वरदान दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निसर्गाने मानवाची रचना करताना, त्याला ३२ दातांचे वरदान दिले आहे. जन्मानंतर वयाच्या १८ वर्षापर्यंत ३२ दातांची निर्मिती टप्प्याटप्प्याने होत असते. पण कोहिनूर नाडे या २० वर्षीय युवकाला निसर्गाने ५२ दातांचे वरदान दिले. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यावर त्याचा परिणाम वाईट होतोच. तसचे कोहिनूरला असलेले अतिरिक्त २० दात त्याच्यासाठी अडचणीचेच ठरत होते. नुकताच त्याच्या दातांवर प्रसिद्ध सर्जन डॉ. धनंजय बरडे यांनी शस्त्रक्रिया केली. कोहिनुरचे अतिरिक्त २० दात काढून त्याचा त्रास कमी केला.
कोहिनूरच्या हनुवटीमध्ये २० दात होते. ते बाहेरून दिसत नसले तरी हिरड्यांमध्ये लपलेले होते. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर नेहमी सूज रहायची. त्याचा त्रास त्याला व्हायचा. डॉ. बरडे यांच्याकडे ऑक्टोबर महिन्यात कोहिनूर नाडे तपासणीसाठी आला होता. त्यांनी त्याच्या दातांचा एक्सरे काढला. त्यात २० दात हनुवटीच्या बाजूला हिरड्यांमध्ये लपलेले होते. डॉक्टरांच्या मते याला एक प्रकारचा ट्युमर किंवा गाठी म्हणतात. भविष्यात रुग्णासाठी ते हानीकारक ठरू शकले असते. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला ऑपरेशनचा सल्ला दिला. दोन आठवड्यापूर्वी त्याच्यावर अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया करताना त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही व्रण येणार नाही, याची काळजी डॉक्टरांनी घेतली. १ तास जवळपास या शस्त्रक्रियेला लागले. या शस्त्रक्रियेतून डॉक्टरांनी त्याच्या हिरड्यांमध्ये लपलेले २० दात बाहेर काढले. शस्त्रक्रियेदरम्यान इतर दातांना त्रास होणार नाही, याची काळजी डॉक्टरांनी घेतली. आता रुग्ण अतिशय स्वस्थ असून, दातामुळे होणारा त्रास त्याचा कमी झाला आहे.
कोहिनूरच्या हिरड्यांमध्ये २० दात लपले होते. त्यांना वाढीला जागाच नव्हती. माझ्या १७ वर्षाच्या प्रॅक्टीसमध्ये दुसऱ्यांदा हा प्रकार आढळला आहे. इतके अतिरिक्त दात असणे हे क्वचितच होते. भविष्यात हे रुग्णांसाठी हानीकारक ठरले असते. रुग्णावर शस्त्रक्रिया केल्याने त्याचा भविष्यातील धोका टळला आहे.
डॉ. धनंजय बरडे, ओरल अॅण्ड मॅक्सीलोफिशल सर्जन