जरा हटके : कुत्रे पकडण्यासाठी मागितली २५०० रुपयांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 09:56 PM2018-11-14T21:56:09+5:302018-11-14T21:57:18+5:30
सार्वजनिक जागेवर बसणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी लाच मागणाऱ्या मनपाच्या दोन ऐवजदार कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक जागेवर बसणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी लाच मागणाऱ्या मनपाच्या दोन ऐवजदार कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार विलास श्रीरामजी चरडे आणि सुरेश कृष्णराव डांगे असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चरडे मनपाच्या आरोग्य विभागात ऐवजदार आहे तर डांगे मनपाच्या मेकॅनिकल विभागात ऐवजदार वाहन चालक आहे. तक्रारकर्ता टिमकी, दादरा पूल येथील रहिवासी आहे. तक्रारकर्त्याने प्रभाग क्रमांक ८, टिमकी दादरा पूल जवळील मोकळ्या जागेवर बसणाºया कुत्र्यांना पकडण्यासाठी गांधीबाग झोन कार्यालयात अर्ज केला होता. १३ नोव्हेंबर रोजी तक्रारकर्ता याबाबत विचारणा करण्यासाठी चरडे आणि डांगे यांना भेटले. दरम्यान चरडे आणि डांगेने तकारकर्त्यास कुत्रे पकडण्यासाठी २५०० रुपये लाच मागितली. तक्रारकर्त्याने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने दोघांना रंगेहात पकडण्याची योजना आखली.
बुधवारी ठरलेल्या योजनेनुसार तक्रारकर्त्याने चरडे व डांगेकडे जाऊन २५०० रुपयाऐवजी १५०० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. दोघेही तयार झाले. बोलणे झाल्यानंतर तक्रारकर्त्याने चरडे व डांगेला १५०० रुपये दिले. रक्कम स्वीकारताच दडून असलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली. सोबतच त्यांच्याविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपायुक्त पी.आर. पाटील व अवर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, पोलीस हवालदार वकील शेख, रविकांत डहाट आणि रेखा यादव यांनी केली.