जरा हटके : अहो ! रस्ता चोरीला गेला, पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 08:32 PM2019-02-22T20:32:08+5:302019-02-22T20:33:05+5:30
पोलीस ठाण्यात दररोज चोरीच्या शेकडो तक्रारी दाखल होतात. परंतु गुरुवारी मानकापूरमधील भारतीयनगरातील नागरिकांनी चक्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई करावी असा पोलिसांना प्रश्न पडला. परंतु नागरिकांनी रस्त्याबाबतचे पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस ठाण्यात दररोज चोरीच्या शेकडो तक्रारी दाखल होतात. परंतु गुरुवारी मानकापूरमधील भारतीयनगरातील नागरिकांनी चक्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई करावी असा पोलिसांना प्रश्न पडला. परंतु नागरिकांनी रस्त्याबाबतचे पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली.
भारतीयनगरात म्हाडाने १९९५ मध्ये वसाहत तयार केली. या वसाहतीत १२ मीटर रुंद रस्ता असल्याची नोंदही नकाशात करण्यात आली. हा रस्ता तयार करण्याची मागणी वसाहतीतील नागरिकांनी प्रशासनाकडे व राजकीय नेत्यांकडे केली. परंतु प्रत्येक वेळी त्यांना केवळ आश्वासने देण्यात आलीत. रस्त्याची मागणी सुरू असताना एका धार्मिक ट्रस्टने या रस्त्यावर अतिक्रमण करून त्यावर भिंत बांधली. त्यामुळे वसाहतीतील नागरिकांनी या अतिक्रमणाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यासकडे निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नाही. रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांना घरी जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. प्रशासन याबाबत काहीच कारवाई करण्यास तयार नसल्यामुळे रहिवाशांचा नाईलाज झाला आहे. अखेर बहुउद्देशीय सेवा अँड वेलफेअर संस्थेचे सचिव आर.बी. वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली वसाहतीतील नागरिकांनी मानकापूर पोलीस ठाण्यात रस्ता चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली.
चोरी झाल्याचे केले पुरावे सादर
रस्ता चोरीला गेल्याचे पुरावे नागरिकांनी मानकापूर पोलीस ठाण्यात सादर केले. यात माहितीच्या अधिकारात मिळालेले १२ मीटर रुंदीचा रस्ता असलेले नागपूर सुधार प्रन्यासच्या नगर रचना विभागाचे पत्र, रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनांच्या प्रतीही पोलिसांना दाखविण्यात आल्या. १९९५ मध्ये मंजूर रस्ता नकाशात असल्याचे नागरिकांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले. अखेर पोलिसांनी नागरिकांची तक्रार दाखल करून घेतली.
रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय
रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी नगरसेवकांकडे केली. परंतु डांबरीकरण करण्यात आले नसल्याने रस्ता कच्चा राहिला. या रस्त्याचा वापर नागरिक बाजाराला जाण्यासाठी, गोधणीला आणि मानकापूर रिंग रोडकडे जाण्यासाठी करीत होते. या रस्त्यावरून लहान मुले शाळेत जात होती. जवळचा रस्ता असल्यामुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा होता. परंतु हा रस्ताच गायब झाल्यामुळे नागरिकांची आणि शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे.