जरा हटके : नागपुरात घराच्या गेटवर लागल्यात लाल पाण्याच्या बाटल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 10:45 PM2019-10-26T22:45:02+5:302019-10-26T22:45:49+5:30
शहरातील अनेक वस्त्यांमध्ये बहुतांश घराच्या गेटपुढे लाल रंगाचे पाणी बाटलीत भरून लटकविल्याचे चित्र आहे. यामागचे कारण विचारले असता, हशा पिकल्याशिवाय राहणार नाही.
मंगेश व्यवहारे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अनेक वस्त्यांमध्ये बहुतांश घराच्या गेटपुढे लाल रंगाचे पाणी बाटलीत भरून लटकविल्याचे चित्र आहे. यामागचे कारण विचारले असता, हशा पिकल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आपल्या घराच्या गेटपुढे या बाटल्या लटकविल्या आहे, ते म्हणतात कुत्रे यामुळे घराच्या दारापुढे शौच करीत नाही. वस्त्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ही अफवा वेगाने पसरली आहे. अनेकांच्या घराच्या गेटपुढे लाल पाण्याच्या बाटला लटकविलेल्या दिसत आहे.
लाल रंगाचे पाणी तयार करून ते बाटलीमध्ये भरून गेटच्या समोर ती बाटली लटकविली आहे. एका एका घरापुढे दोन दोन बाटल्या आहे. हा प्रकार स्लम वस्त्यांमध्येच नाही, तर सुशिक्षितांच्या वस्त्यांमध्ये सुद्धा बघायला मिळतो आहे. वस्त्यांमध्ये फिरणारे मोकाट कुत्रे घरापुढे शौच करतात. अनेकजण या त्रासामुळे कंटाळले आहे. मात्र त्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी हा पर्याय निवडला आहे. नेमकी ही शक्कल कुणी लढविली आणि ती शहरभर कशी काय पसरली यासंदर्भात काही रहिवाशांशी चर्चा केली. परंतु कुणालाच यामागचे खरे कारण माहीत नाही. लोकांनी सांगितले की, कुत्रे लाल पाणी पाहून शौच करीत नाही. वस्तीमध्ये एकमेकांनी लावलेले पाहून आम्ही सुद्धा लावले. चंद्रमणीनगर मधील राजू वाघमारे म्हणाले की, बाटल्या लावल्यानंतर कुत्र्यांनी शौच केलेली आढळली नाही. यामागचे तथ्य जाणून घेण्यासाठी शहरातील श्वान तज्ञ डॉ. हेमंत जैन यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, कुत्रे हे कलर ब्लार्इंड असतात. त्यांना डोळ्यांनी कलर ओळखता येत नाही. जसा माणसांच्या डोळ्यात दोन कोन असल्यामुळे माणसांना रंग ओळखता येतो. मात्र कुत्र्यांच्या डोळ्यात कोनची संख्या माणसाच्या तुलनेत फार कमी असते. कुत्रा फक्त पिवळा व निळा रंग काही प्रमाणात ओळखतो. घरासमोर लाल रंगाचे पाणी भरलेली बॉटल ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. कुत्रे घरासमोर शौच किंवा लघवी करणे म्हणजे ते प्रथम वास घेतात योग्य जागा शोधतात व नंतरच करतात. कुत्री जेव्हा हीट पिरेडवर असते, तेव्हा तिचा वास इतर कुत्र्यांना अर्धा किलोमीटरपर्यंत जातो व इतर कुत्रे तिच्यामागे लागतात. त्यामुळे कुत्रे घरासमोर येऊन लघवी करतात. त्याला ‘सेंट मार्किंग’ असे म्हणतात.
डॉक्टरांच्या मते ही अंधश्रद्धा असली तरी, शहरात ती झपाट्याने पसरत आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यामुळे कुत्रे घरासमोर शौच करीत नाही
व्हिनेगर, मीरे पुड, तिखट घरासमोर टाकल्यामुळे कुत्रे तिथे भटकत नाही व घरासमोर शौच किंवा लघवी करीत नाही. त्या वासामुळे कुत्रे दूर पळतात.
डॉ. हेमंत जैन, प्रसिद्ध श्वान तज्ञ