अबब ! तीन किलोमीटर लांबीची रेल्वेगाडी; नाव ठेवले ‘शेषनाग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 09:20 AM2020-07-03T09:20:02+5:302020-07-03T09:22:22+5:30
भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी चार मालगाड्यांना जोडून एक रेल्वेगाडी यशस्वीरीत्या तयार केली. जवळपास ३ किलोमीटर लांबीच्या या मालगाडीला ‘शेषनाग’ नाव देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी चार मालगाड्यांना जोडून एक रेल्वेगाडी यशस्वीरीत्या तयार केली. जवळपास ३ किलोमीटर लांबीच्या या मालगाडीला ‘शेषनाग’ नाव देण्यात आले. या गाडीत २३६ वॅगन, चार ब्रेक व्हॅन आणि ९ विद्युत लोको शेडचा समावेश आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग या घटनेला ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये दाखल करण्याचा प्रयत्न करीत आहे.
नागपूर विभागाच्या परमालकसा रेल्वेस्थानकावर गुरुवारी दुपारी १२.३० वाजता ही रिकामी रेल्वेगाडी कोरबासाठी रवाना झाली. या गाडीने परमालकसा ते दुर्गपर्यंत २२ किमीचे ४५ मिनिटांचे अंतर पार केले. त्यानंतर ही गाडी बिलासपूर आणि कोरबासाठी रवाना झाली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी याबाबत विभागातील अधिकारी अधिक उत्साही असल्याचे सांगितले. यामुळे अधिक माल वाहतुकीसोबत वेळेवर धान्य किंवा इतर साहित्य पोहोचविण्यासाठी हे मोठे पाऊल असून आतापर्यंत देशात असा प्रयत्न करण्यात आला नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मालगाड्यांचा वेग वाढला
रेल्वेगाड्यांच्या गतीबाबत रेल्वेत स्पीडगनच्या माध्यमातून आकस्मिक तपासणी करण्यात येत आहे. विभागीय परिचालन शाखेच्या तंत्रानुसार मालगाड्यांच्या वेगात वाढ झाली आहे. आधी मालगाड्या ५० किलोमीटर प्रतितास धावत होत्या. आता मालगाड्यांचा वेग ८० किलोमीटर प्रतितास वाढला आहे.