जरा हटके! स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे... ज्योती आमगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:39 PM2018-05-08T14:39:30+5:302018-05-08T14:39:38+5:30
जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून जगविख्यात असलेल्या आणि नागपूरची रहिवासी असलेल्या ज्योती आमगे यांनी, एका मुलाखतीत, देशात स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोलताना, याविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी आवाज उठवला पाहिजे असे परखड मत व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून जगविख्यात असलेल्या आणि नागपूरची रहिवासी असलेल्या ज्योती आमगे यांनी, एका मुलाखतीत, देशात स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोलताना, याविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी आवाज उठवला पाहिजे असे परखड मत व्यक्त केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी विविध प्रश्नांना कधी मिश्किल तर कधी गंभीर उत्तरे दिली.
प्रसिद्ध व्यक्ती लग्न करत नाहीत असे मत एका प्रश्नादाखल व्यक्त केले. हे करताना त्यांनी, त्यात सलमान खानही आला अशी कोपरखळीही पुढे हंसतहंसत मारली.
आपल्या देशातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक असावी व मुलींच्या सुरक्षेसाठी सज्ज असावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून लढवण्याचा इरादाही जाहीर केला.
देशात असलेल्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कठुआची न्यूज पाहून खूप वाईट वाटले. दोषींना जेव्हा शिक्षा होत नाही तेव्हा संताप होतो. या सर्व अत्याचारांविरुद्ध एकजुटीने व ताकदीने आवाज उठवला पाहिजे, असे त्या पुढे म्हणाल्या.
आपल्या यशाचे श्रेय त्यांनी कुटुंबियांना दिले. त्यांनी साथ दिली नसती तर मी एवढ्या उंचीवर गेलेच नसते. ते कायम माझ्यासोबतच असतात. आपले स्वप्न अॅक्ट्रेस बनण्याचे होते, जे आता बनले आहे. मी सलमानची फॅन आहे. मला लग्न करायचे नाही. प्रसिद्ध व्यक्तींनी लग्न केले तर कसे चालेल? प्रसिद्ध व्यक्ती लग्न करत नाहीत. सलमाननेही केले नाही.. अशी पुस्ती त्यांनी पुढे जोडली. जेवणात त्यांना शाकाहारी भोजन आवडते. त्यात पनीर व चायनीजचाही समावेश त्यांनी केला. कोणत्याही खेळाची आपल्याला आवड नाही मात्र महेंद्रसिंग धोनी जेव्हा फटकेबाजी करतो तेव्हा खूप चांगले वाटते असे मत ज्योती आमगे यांनी यावेळी व्यक्त केले.