जरा हटके : चालती फिरती टेलिफोन ‘डिरेक्टरी’ ; प्रेमराज दवंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:09 PM2018-11-29T22:09:12+5:302018-11-29T22:18:36+5:30
कुणाला अमूक व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितल्यास, आठवत नाही...थांब मोबाईलमध्ये आहे. बिझनेस कार्ड पाठवतो, कुठल्याही कार्यालयात, घराघरांमध्ये किंवा सार्वजनिक स्थळी सहज ऐकायला मिळणारे हे वाक्य. परंतु एक व्यक्ती अशीही आहे जी चालता-फिरता टेलिफोन ‘डिरेक्टरी’ आहे. त्याला एकदा नंबर सांगितल्यास विसरत नाही. त्याच्या ‘मेमरी’मध्ये कायमचा ‘सेव्ह’ होतो. विशेष म्हणजे, या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये एकही नंबर ‘सेव्ह’ नाही. या अफलातून व्यक्तीचे नाव प्रेमराज लक्ष्मण दवंडे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुणाला अमूक व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितल्यास, आठवत नाही...थांब मोबाईलमध्ये आहे. बिझनेस कार्ड पाठवतो, कुठल्याही कार्यालयात, घराघरांमध्ये किंवा सार्वजनिक स्थळी सहज ऐकायला मिळणारे हे वाक्य. परंतु एक व्यक्ती अशीही आहे जी चालता-फिरता टेलिफोन ‘डिरेक्टरी’ आहे. त्याला एकदा नंबर सांगितल्यास विसरत नाही. त्याच्या ‘मेमरी’मध्ये कायमचा ‘सेव्ह’ होतो. विशेष म्हणजे, या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये एकही नंबर ‘सेव्ह’ नाही. या अफलातून व्यक्तीचे नाव प्रेमराज लक्ष्मण दवंडे.
प्रेमराज हे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात शिपाई म्हणून कार्यरत आहे. बारावी नापास असलेले परंतु कुठलाही नंबर सांगा ते नेहमीच लक्षात ठेवणारे प्रेमराज याची आरोग्य विभागाच्या माताकचेरी परिसरात वेगळी ओळख आहे. येथील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर त्यांना तोंडपाठ आहेत. एखाद्या अधिकाऱ्याला तातडीने कुणाचा नंबर हवा असल्यास ते आवर्जून प्रेमराजला फोन करतात. विशेषत: कार्यालयीन सुटीच्या दिवशी किंवा रात्री हमखास ‘प्रेमराजला’ फोन येतो.
प्रेमराजची परीक्षा पाहण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्याला आपला मोबाईल नंबर सांगून तो नंबर अमूक अधिकाऱ्यांना सांगण्यास सांगितला. त्या अधिकाऱ्याने दोन दिवसानंतर तो नंबर पुन्हा पे्रमराजला विचारला असता त्याने न चुकता सांगितला. प्रेमराजकडे मोबाईल आहे, पण एकही नंबर ‘सेव्ह’ नाही. तो मोबाईलचा उपयोग केवळ संवाद साधण्यासाठी करतो. त्याला बोलते केल्यावर म्हणाला, नोकरीला लागलो त्यावेळी मोबाईल फोन नव्हता. सर्व कामे फॅक्सवर व्हायची. सहा जिल्ह्यांना फॅक्स करावे लागायचे. त्यांची माहिती त्यांना टेलिफोनवरून द्यावी लागायची. अनेक गोपनीय फॅक्स असल्याने नंबर चुकू न देण्याची ताकीद असायची. त्यामुळे विशिष्ट जिल्ह्याचे विशिष्ट नंबर, कार्यालयाचे नंबर व संबंधित अधिकाऱ्यांचे नंबर पाठ करणे सुरू केले. परंतु लक्षात राहत नव्हते. मात्र व्यक्तीचा चेहरा किंवा त्याची विशिष्ट ओळख व नंबर डोळ्यासमोर आणल्यास तो नंबर लक्षात राहत असल्याचे लक्षात आले. ही पद्धती विकसित केली आणि पुढे कामाचा हा भाग सवयीचा झाला, असेही तो म्हणाला.
कामाचा ताण व मोबाईलच्या अतिवापरामुळे रोजच्या महत्त्वाच्या गोष्टीही विसरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पाठ असलेले मोबाईल नंबर्स किंवा रोजच्या घडामोडी तरुणाईच्या लक्षात राहत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यात बारावी नापास प्रेमराजने नंबर लक्षात ठेवण्याची आत्मसात केलेली विशिष्ट शैली कौतुकास्पद आहे.