जिद्द माझी आई, स्वप्न माझे बाबा, मी लेक या जगाची! अनाथाश्रमातील जयाने एमपीएससीचा गड केला सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 11:38 AM2023-07-18T11:38:10+5:302023-07-18T12:01:04+5:30

पोलिस उपनिरीक्षक म्हणून झाली निवड

Jaya from Orphanage cleared MPSC exam, got selected as Sub Inspector of Police | जिद्द माझी आई, स्वप्न माझे बाबा, मी लेक या जगाची! अनाथाश्रमातील जयाने एमपीएससीचा गड केला सर

जिद्द माझी आई, स्वप्न माझे बाबा, मी लेक या जगाची! अनाथाश्रमातील जयाने एमपीएससीचा गड केला सर

googlenewsNext

खापरखेडा (नागपूर) : कुणी म्हणे अनाथ, कुणी म्हणे पोरकी! खरे नावही माहीत नाही, ती कुठची याचीही तिला जाण नाही... अनाथाश्रमात मिळालेल्या नावानेच ती जगत असलेल्या आणि माय-बापाची ओळख नसलेल्या जया प्रदीप सोनटक्के, हिने संघर्षाच्या अथांग डोहात जिद्द आणि स्वयंप्रेरणेने स्वप्नांच्या आभाळाला गवसणी घालण्याचे कार्य केले आहे.

जयाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून, तिची पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी निवड झाली आहे. विधिवत प्रशिक्षणानंतर तिची नियुक्तीही होणारच आहे. तिच्या या संघर्षाचे आकलन केले, तर तिची जिद्द हीच आई आहे आणि तिचे स्वप्न हेच तिचे बाबा असल्याचे उमगायला होते.

१ एप्रिल १९९९ रोजी झिंगाबाई टाकळी येथील शासकीय सर्वोदय बालसदनगृहात आलेल्या जयाने भारतीय कृषी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तिची रवानगी समाज कल्याणच्या शासकीय संस्थेत करण्यात आली होती. परंतु, बालिका असल्याने पुन्हा तिला सर्वोदय बालसदनमध्येच आणण्यात आले. येथून तिने बीबीएची पदवी घेतली. नंतर नोकरी करत असतानाच एमबीए पूर्ण केले.

पुढच्या शिक्षणासाठी श्रीकांत भारतीय व श्रेया भारतीय यांच्या संस्थेने तिला मायेची वागणूक देत तिला प्रोत्साहित केले. एमपीएससीची परीक्षा देण्याचे तिचे स्वप्न होते आणि त्यासाठी वसतिगृहाचे प्रमुख रमेश गौर यांनी संपूर्ण साहाय्य केले. या सहकार्यातून तिने पूर्ण येथे लायब्ररीमध्ये प्रवेश घेतला आणि सलग दोन वर्ष स्वतःला अभ्यासात झोकून दिले. २०२० मध्ये तिने एमपीएससी दुय्यम सेवा अराजपत्रित गट (ब) मुख्य परीक्षा दिली. या परीक्षेतील उत्तीर्णांची यादी जुलै महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली. त्यात तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिची निवड पीएसआय पदाकरिता झाली आहे. जयाचे यश हे इतर अनेक संघर्ष करणाऱ्या मुला- मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

धंतोली पोलिसांना सापडली

१ मार्च १९९९रोजी जया धंतोली पोलिसांना विनापालक आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला चाइल्ड लाइनच्या ताब्यात दिले. तिथे झिंगाबाई टाकळी येथील सर्वोदय बालसदनमध्ये तिला दाखल केले होते.

तिला मी शाळेपासूनच ओळखते. परिश्रम आणि चिकाटी तिच्या वृत्तीत आहे. तिचे हे यश कौतुक करण्यासारखे आहे. तिची ही संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरनास्त्रोत आहे.

ज्योती पवार, मपोशि, पोलिस मुख्यालय (वर्गमैत्रिण)

Web Title: Jaya from Orphanage cleared MPSC exam, got selected as Sub Inspector of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.