‘जयचंद’चा भिवापूर परिसरातील जनावरांवर वारंवार हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:56 AM2018-01-30T10:56:40+5:302018-01-30T10:59:31+5:30
‘जयचंद’ नामक वाघाने शेतात असलेल्या गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढविला. त्यात तीन जनावरे जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाचीही झोप उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंधरवड्यापूर्वी गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात ‘जयचंद’ नामक वाघाचा बछडा पडला होता. त्यामुळे अभयारण्याबाहेर ‘जयचंद’चा मुक्त संचार वाढला असल्याचे स्पष्ट झाले. याच ‘जयचंद’ने शेतात असलेल्या गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढविला. त्यात तीन जनावरे जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाचीही झोप उडाली आहे.
रुबाबदार शरीरयष्टी आणि आकर्षणाचे केंद्र असलेला ‘जय’ हा वाघ वर्षभरापासून बेपत्ता आहे. तर ‘चांदी’ वाघीणचे वास्तव्य अजूनही उमरेड अभयारण्यात आहे. ‘जयचंद’ हा ‘जय’ आणि ‘चांदी’चा बछडा आहे. ‘जय’सारखाच तोसुद्धा रुबाबदार आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी हाच ‘जयचंद’ अभयारण्याबाहेर निघाला. त्यातच तो गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पडला. त्यानंतर त्याला कालव्यातून काढण्यासाठी वनविभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्याला काढताच त्याने धूम ठोकली. तेव्हापासून त्याने जंगलाबाहेर ठाण मांडले असल्याची शक्यता आहे. दरम्यान त्याने चिखली येथील पांडुरंग राजूरकर यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या बैलावर हल्ला चढवित ठार केले.
‘जयचंद’ने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चिखली शिवारातील शरद दिघोरे यांच्या गोठ्यात प्रवेश केला. तेथे ११ जनावरे बांधून होती. त्यापैकी तीन जनावरांवर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले असून दोन जनावरे मरणासन्न स्थितीत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास शरद हे शेतात गेले असता त्यांना सदर प्रकार निदर्शनास आला. याबाबत वन विभागाला सूचना करताच घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला. ‘जयचंद’ने या घटनांपूर्वी चिखली शिवारातच एका जनावरावर हल्ला चढवित ठार केले होते, हे विशेष!
वाढते हल्ले थांबणार कधी?
सध्या ‘जयचंद’चे जनावरांवरील वाढते हल्ले डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. जनावरांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या वाघाचे नंतर मनुष्यावरही हल्ले होत गेले, याची आतापर्यंत अनेक उदाहरणे आहेत. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अशाप्रकारे नरभरक्षक वाघाला गोळ्या घालण्यात आल्या. तर ब्रह्मपुरीच्या जंगलात वास्तव्यास असणाऱ्या वाघिणीनेही मनुष्यावर हल्ले चढवित जीवितहानी केली. त्यामुळे त्या वाघिणीला कैद करण्यात आले होते. तिला सोडताच पुन्हा तिचे वाढते हल्ले पाहता तिला मारण्याचे आदेश दिले होते. त्यातच त्या वाघिणीचा विद्युत तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला. अशाप्रकारचे आता ‘जयचंद’लासुद्धा चटक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे.