नितीन गडकरींना धमकी देणारा जयेश अखेर नागपूर पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 07:21 PM2023-03-28T19:21:34+5:302023-03-28T19:22:08+5:30
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी आरोपी जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याला ताब्यात घेतले आहे.
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी आरोपी जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याला ताब्यात घेतले आहे. त्याला मंगळवारी बेळगाव तुरुंगातून नागपुरात कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत आणण्यात आले. त्याची दिवसभर सखोल चौकशी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
२१ मार्च रोजी सकाळी १०.५३ रोजी गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. यानंतर खळबळ उडाली होती. पोलिस यंत्रणादेखील लगेच कामाला लागली. फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी अशी सांगितली होती. एका महिलेचा नंबर देऊन त्याने तिला गुगल पेवर दहा कोटी रुपये भरण्यास सांगितले. दि. १४ जानेवारीप्रमाणे हा फोनदेखील बेळगाव कारागृहाच्या परिसरातून आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचे पथक बेळगावसाठी रवाना झाले होते. पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत चौकशीसाठी जयेशचा प्रॉडक्शन वॉरंट मिळविला. त्याला मंगळवारी सकाळी नागपुरात आणण्यात आले.
जयेशला बेळगावमधून बाहेर पडायचे होतेच
नागपूर पोलिसांनी बेळगावमध्ये जयेशची चौकशी केली असता त्याने मला येथे राहायचे नसून मला दुसऱ्या कोणत्याही गुन्ह्यात अडकवून येथून बाहेर काढा, असे म्हटले होते. त्याने बेळगाव तुरुंगातील अधिकाऱ्यांनादेखील अनेकदा असे म्हटले होते. अखेरीस तो तेथून बाहेर निघालाच. त्याने गडकरी यांच्या कार्यालयात जाणुनबुजून याच कारणासाठी तर फोन केला नाही ना याची चौकशीदेखील होत आहे.