गॅंगस्टर सफेलकरचा राजमहल जेसीबीने जमीनदोस्त : गुन्हे शाखेच्या पुढाकाराने कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 08:04 PM2021-04-28T20:04:29+5:302021-04-28T20:09:38+5:30
JCB smashed gangster Safelkar's palace कुख्यात रणजीत सफेलकर याचे कामठी मार्गावरील खैरी येथील राजमहाल बुधवारी जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आले. पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेत खैरी ग्राम पंचायत, एनएमआरडी आणि सिंचन विभाग यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात रणजीत सफेलकर याचे कामठी मार्गावरील खैरी येथील राजमहाल बुधवारी जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आले. पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेत खैरी ग्राम पंचायत, एनएमआरडी आणि सिंचन विभाग यांच्या पथकाने ही कारवाई केली. कुख्यात संतोष आंबेकर आणि सय्यद साहील याच्यानंतर गुन्हे शाखेच्या पुढाकाराने पहिल्यांदाच ही कारवाई करण्यात आली. सफेलकर टोळीवरुद्ध फास आवळल्यापासून दोन महिन्यांदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
राजमहालची कमीत १० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यात सफेलकरसह कामठीतील सुनील अग्रवाल आणि रामजी शर्मा हे भागीदार आहेत. अग्रवाल हे रेशन तर शर्मा कॅटरिंगचा व्यवसाय करतात. दोघेही एका राष्ट्रीय पक्षाशी आणि माजी मंत्र्यांशीही जुळलेले आहेत. या माजी मंत्र्यांचे सफेलकरसह नातेसंबंधही होते. राजमहालात लग्न समारंभ आणि इतर समारंभही होत होते. सफेलकर टोळीच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेला राजमहालचेही अवैध बांधकाम झाल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी सभागृह, कार्यालय, किचन आदी बांधकाम करण्यात आले होते. बांधकामाबाबत अधिकृत संस्थेकडून मंजुरी घेण्यात आली नव्हती. सफेलकरची दहशत असल्याने कुणीही कारवाई करीत नव्हता. पोलिसांनी कारवाईची शिफारस केल्यानंतर स्थानिक प्रशासनाला जाग आली. त्यानंतर, खैरी ग्रामपंचायतने बांधकाम तोडण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार, बुधवारी सकाळी ६ वाजता पोलीस बंदोबस्तासह खैरी ग्रामपंचायतचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तीन जेसीबीच्या मदतीने त्यांनी अवैध बांधकाम तोडायला सुरुवात केली. पोलिसांनी कारवाई गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु बांधकाम तोडण्यात येणार असल्याची चर्चा मंगळवारपासूनच सुरू होती. कालवा बुजविल्यामुळे सफेलकर व त्याच्या भागीदाराविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. सफेलकरचे भागीदार यापूर्वीही चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या भूमिकेचाही पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान, या जमिनीच्या सौद्यासंदर्भातही संशय व्यक्त केला जात आहे. या जमिनीच्या मलाकाचा संयुक्त परिवार होता. या परिवारातील एक सदस्य सफेलकरला जमीन विकण्याच्या विरोधात होता. यानंतरही ५० लाख रुपयांत जमिनीचा सौदा झाला. दरम्यान, विराेध करणाऱ्या सदस्याचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. या घटनेला आत्महत्या सांगण्यात आले, परंतु पोलिसांना ती आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी होणार आहे. विशाल पैसाडेलीच्या हत्येलाही सफेलकर टोळीने अपघात असल्याचे सांगितले हाेते. त्याच्या पत्नीलाही पैसे देऊन शांत राहण्यास मजबूर करण्यात आले. ११ वर्षांनंतर विशालच्या हत्येचा खुलासा झाला.
नगरपालिका क्षेत्रात आठ अवैध संपत्ती
गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी सांगितले की, सफेलकरने रामटेकमध्ये एमटीडीसीच्या १२ कोटी रुपये किमतीच्या रिसोर्टवर कब्जा केला होता. ज्याला या रिसोर्टचे कंत्राट मिळाले होते, त्याच्याकडून सफेलकरने ते बळजबरीने घेऊन तो स्वत: रिसोर्ट चालवित होता. सफेरकरचा कब्जा हटवून कंत्राट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. नगरपालिका क्षेत्रात सफेलकरच्या आठ अवैध संपत्ती सापडली आहे. तहसीलदाराच्या मदतीने या संपत्तीविरुद्धही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.