जेईई-मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर; नागपूरचा अद्वय कृष्णा देशात ३६ वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2022 09:33 PM2022-08-08T21:33:47+5:302022-08-08T21:34:12+5:30
Nagpur News नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने सोमवारी प्रथम व द्वितीय सत्राचे मिळून जेईई मेनचा अंतिम निकाल जाहीर केला. मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षेत अद्वय कृष्णाने अखिल भारतीय स्तरावर ३६ वी रँक प्राप्त करण्यात यश मिळविले आहे.
नागपूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने सोमवारी प्रथम व द्वितीय सत्राचे मिळून जेईई मेनचा अंतिम निकाल जाहीर केला. मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षेत अद्वय कृष्णाने अखिल भारतीय स्तरावर ३६ वी रँक प्राप्त करण्यात यश मिळविले, तर अनुज चांडक याने १७४ व सोहम डहाणेने २९३ वी रँक प्राप्त केली.
परीक्षेच्या तयारीशी संबंधित जाणकारांनुसार यावर्षी जेईई मेनचे अंतिम निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय होऊ शकले नाहीत. नागपुरातून परीक्षा देणारे किती विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र झाले, याची आकडेवारी एनटीएने जारी केली नाही. जाणकारांनुसार यावर्षी १२०० विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय केले आहे. मागच्या वर्षी ही संख्या २४३९ इतकी होती. यावर्षी क्वालिफाय करणाऱ्यांची संख्या कमी होईल, याचे संकेत जेईई मेनच्या पहिल्या टप्प्याच्या निकालानंतरच स्पष्ट झाले होते. दुसऱ्या टप्प्यात अनेक विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला; परंतु थोड्या फरकाने ते क्वालिफाय होऊ शकले नाहीत.
पहिल्या सत्रात चांगले पर्सेंटाईल प्राप्त करणारे अनेक विद्यार्थी दुसऱ्या सत्रात सहभागी झाले नाहीत. अद्वय कृष्णाने पहिल्या सत्रात ९९.९९ पर्सेंटाईल प्राप्त केले होते. अनुज चांडकने ९९.९८ पर्सेंटाईल व स्वनिक गणे व सोहम डहाणे यांनी ९९.९० पर्सेंटाईल प्राप्त केले होते.
आयआयटी मुंबईत घ्यायचाय प्रवेश
अंतिम निकालात ३६ वी रँक प्राप्त करणाऱ्या अद्वयने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय व शिक्षकांना दिले. भविष्यात आयआयटी मुंबईत प्रवेश घेण्याची इच्छा आहे. अद्वयचे वडील अमित कुमार श्रीवास्तव हे डब्ल्यूसीएल (वेकोलि)मध्ये मुख्य दक्षता अधिकारी आहेत. आई गृहिणी आहे.