लग्नासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचे ३.७६ लाखांचे दागिने चोरीला; नागपूर-पांढरकवडा बसमधील घटना
By दयानंद पाईकराव | Published: April 27, 2024 07:31 PM2024-04-27T19:31:34+5:302024-04-27T19:32:32+5:30
बसमध्ये खचाखच गर्दी असल्यामुळे त्या कंडक्टरच्या सीटजवळ पायऱ्यावर उभ्या होत्या.
नागपूर: नातेवाईकाच्या लग्नासाठी हिंगणघाटला माहेरी जात असलेल्या महिलेचे ३ लाख ७६ हजारांचे दागिने चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राखी युवराज लोहकरे (४७, रा. युवराज जीवन अक्षय सोसायटी न्यु मनिषनगर) असे दागीने चोरी गेलेल्या महिलेचे नाव आहे. हिंगणघाट येथे त्यांचे माहेर आहे. सोमवारी २२ एप्रिलला दुपारी ३ वाजता त्या नागपूर-पांढरकवडा बसने नातेवाईकाच्या लग्नासाठी माहेरी जात होत्या. त्या छत्रपती चौकातील बस थांब्याहून बसमध्ये बसल्या.
बसमध्ये खचाखच गर्दी असल्यामुळे त्या कंडक्टरच्या सीटजवळ पायऱ्यावर उभ्या होत्या. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने त्यांचे सोन्याचे दागीने व मोत्याची माळ ठेवलेली पर्स त्यांची नजर चुकवून चोरी केली. त्यात ३ लाख ७६ हजार रुपयांचे दागीने होते. माहेरुन परतल्यानंतर त्यांनी शुक्रवारी २६ एप्रिलला प्रतापनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रतापनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल कदम यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.