लॉकडाऊनमुळे दागिन्यांचे कारागीर बेरोजगार : नागपुरात २० हजारांवर उपासमारीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 12:31 AM2020-04-15T00:31:24+5:302020-04-15T00:32:55+5:30
लॉकडाऊनमुळे कारागिरांवर ऐन सोनेरी दिवसातच संकट ओढवले आहे. मिळकत नसल्याने कुटुंबीयांचे पालनपोषण कसे करायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सराफांसह सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारागिरांसाठी मार्च, एप्रिल आणि मे ही तीन महिने सुगीचे असतात. तीन महिन्यातील कमाईच्या रकमेची वर्षभरासाठी जुळवाजुळव करून ठेवतात. पण यावर्षी लॉकडाऊनमुळे कारागिरांवर ऐन सोनेरी दिवसातच संकट ओढवले आहे. मिळकत नसल्याने कुटुंबीयांचे पालनपोषण कसे करायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. जेम्स अॅण्ड ज्वेलरी असोसिएशनचे पदाधिकारी कारागिरांचे आधार कार्ड घेऊन आर्थिक मदतीसाठी पुढे आले आहेत.
नागपूर सराफांसाठी मध्य भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ असून गलाई, गठाई, डाय कटिंग करणाऱ्यांसह सोन्याचे दागिने तयार करणारे जवळपास २० हजार नागपुरात कारागीर आहेत. यातील बहुतांश कारागीर मूळचे पश्चिम बंगालचे तर गलाई आणि गठाई करणारे कोल्हापूर व सोलापूरचे आहेत. सर्व कारागीर विखुरले असून नागपुरात राहूनच कुटुंबाचे पालनपोषण करतात. तीन महिन्यांच्या सीझनसाठी कारागिरांचे जानेवारीपासूनच काम सुरू होते. पण लॉकडाऊननंतर त्यांच्यावर संकट कोसळले आहे. काम बंद झाले आहे.
सर्व कारागिरांचे काम कंत्राटीवर असते. हाताला कामच नसल्याने त्यांना मदत करण्यास कुणीही तयार नाही. काही भागात जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात त्यांना मदत मिळत आहे. पण किती दिवस मिळणार, हा गंभीर प्रश्न आहे. कामच नसल्याने पुढे काय करायचे, याची चिंता त्यांना सतावत आहे. हाती रोख रक्कम नसल्याने औषध उपचार आणि आवश्यक वस्तूंची खरेदी करणे शक्य नाही. ही स्थिती किती दिवस राहणार, याची कुणालाही माहिती नाही. त्यामुळे कारागिर चिंतेत असून ते संघटित नसल्याने सरकारकडून मदतही मिळणार नाही. सराफा असोसिएशनने मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे.
नुकसानीचा आकडा सांगणे कठीणच
लग्नाच्या सीझनसाठी सराफा व्यापारी सज्ज असतानाच लॉकडाऊन झाले. त्यामुळे सराफांचे सर्व व्यवहार बंद आहेत. यंदाच्या सीझनमध्ये किती कोटींचे नुकसान होईल, याची आकडेवारी सांगणे कठीण आहे. पण लॉकडाऊनमुळे व्यवसायाची साखळी तुटली आहे. नागपूर जिल्ह्यातील ३ हजारांपेक्षा जास्त छोट्या सराफा व्यावसायिकांवरही संकट आले आहे. त्यातील अनेकजण कारागीर आहेत. लग्नसराई नसल्याने दागिन्यांचे ऑर्डरच बंद आहेत.
विशेष दागिना निर्मितीत नागपूरची खासीयत
चपलाकंठी, बांगड्या, अष्टपैलू पाटल्या, बदामी अंगठ्या, नथ, कंठी मंगळसूत्र, डोरले आदींच्या निर्मितीत नागपुरातील कारागिरांची खासीयत आहे. जेवढे काम करेल, तेवढीच कारागिरी त्यांना मिळते. लॉकडाऊनमुळे संपूर्ण सीझनच थांबल्याने कुणाकडेही काम नाही. त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.
जेम्स अॅण्ड ज्वेलरी असोसिएशनची मदत
लॉकडाऊनमुळे सोन्याचे दागिने तयार करणारे कारागीर संकटात आहेत. त्यांना देशस्तरावरील संघटना जेम्स आणि ज्वेलरीतर्फे मदत करण्यात येत आहे. कारागिरांचे आधार कार्ड घेऊन मुंबई कार्यालयाला पाठवून त्यांच्या खात्यात रोख रक्कम टाकण्यात येत आहे. जास्तीत जास्त कारागिरांना आवश्यक मदत करण्याचा असोसिएशनचा प्रयत्न आहे. नागपुरात प्रदीप कोठारी आणि राजेश रोकडे असोसिएशनचे सदस्य आहेत.
- पुरुषोत्तम कावळे, संचालक, जेम्स अॅण्ड ज्वेलरी असोसिएशन.