झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगडची निर्मिती राजद्रोह होता का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 09:29 PM2018-05-05T21:29:30+5:302018-05-05T21:29:47+5:30
राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी करीत विदर्भवाद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याचा विदर्भवाद्यांनी चांगलाच समाचार घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी करीत विदर्भवाद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याचा विदर्भवाद्यांनी चांगलाच समाचार घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांच्याकाळात बिहारमधील झारखंड, उत्तर प्रदेशातून उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील छत्तीसगड या तीन लहान राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हा केंद्र सरकारमध्ये शिवसेनाही सहभागी होती. त्यामुळे या राज्य निर्मितीत त्यांचाही तितकाच वाटा होता. तेव्हा तो राजद्रोह होता का, असा सवाल विदर्भवाद्यांनी प्रकाश जाधव यांना विचारला असून स्वतंत्र विदर्भ राज्य ही जनतेची मागणी असून ते मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असा निर्धारही व्यक्त केला.
मूर्खपणा व हास्यास्पद वक्तव्य
शिवसेनेचे प्रकाश जाधव यांनी विदर्भवाद्यांबाबत केलेले वक्तव्य हे मूर्खपणाचे व हास्यास्पद आहे. वाजपेयी यांच्या काळात उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हा शिवसेनाही त्यांच्यासोबतच सत्तेत होते. त्यामुळे त्या राज्य निर्मितीत त्यांचाही वाटा होता. तेव्हा त्याला राजद्रोह म्हणायचे का? त्यामुळे त्यांचे वक्तव्य हे हास्यास्पद आहे. आम्ही वकील मंडळी राज्यातील व्यवस्थेविरुद्ध बोलतो. वकिली हे आमचे प्रोफेशन आहे. आम्ही सरकारच्या बाजूनेही लढू शकतो किंवा सरकारच्या विरुद्धही लढू शकतो. त्यामुळे आम्ही काही चुकीचे करतो असे होत नाही.
अॅड. मुकेश समर्थ
अध्यक्ष, व्ही-कॅन
...तो ही राजद्रोह म्हणाल का?
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना त्यांनी तीन नवीन राज्याची निर्मिती केली. तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनाही सत्तेत होते. तेव्हा तीन नवीन राज्याची निर्मिती करण्याचा तेव्हाचा वाजपेयी यांच्या निर्णयाला सुद्धा राजद्रोह म्हणायचे आहे का? त्यांच्याविरुद्धही प्रकाश जाधव राजद्रोहाच्या कारवाईची मागणी मागणी करणार का? वेगळा विदर्भ ही जनतेची मागणी आहे. वेगळा विदर्भ झाला तर तो काही देशाबाहेर राहणार नाही. एका घरात दोन भावांचे दोन पक्ष चालू शकतात. तर मग दोन राज्य का नाही? स्वतंत्र विदर्भाची मागणी ही जनतेची मागणी असून तो मिळेपर्यंत आम्ही लढत राहू.
राम नेवले
मुख्य संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती
... त्यांनी महाराष्ट्रात खुशाल राहावे
महाराष्ट्र राज्यात राहून विदर्भ कसा मागास राहिला, हे अनेकदा प्रमाणासह सिद्ध झालेले आहे. त्यावर बरेच काही बोललेही जाते. आकडेवारीवरून ते अनेकदा सिद्धही करण्यात आलेले आहे. परंतु विदर्भात राहूनही विदर्भातील व्यथा ज्यांना दिसून येत नाही. त्यांना काय म्हणावे. ज्यांना महाराष्ट्राचा पुळका असेल त्यांनी महाराष्ट्रात खुशाल राहावे. स्वतंत्र विदर्भ राज्य ही जनतेची मागणी आहे, आणि ती पूर्ण करेपर्यंत आम्ही लढत राहू.
अॅड. नंदा पराते
आदिम संविधान संरक्षण समिती
विदर्भाचा नागरिकच योग्य वेळी उत्तर देईल
विदर्भवाद्यांबाबत करण्यात आलेले वक्तव्य हे अतिशय दुर्दैवी असे आहे. याचे उत्तर विदर्भातील नागरिकच येणाऱ्या निवडणुकीत मतदानपेटीतून योग्य पद्धतीने देईलच.
राजकुमार तिरपुडे
संस्थापक, विदर्भ माझा