जेएमएफसी : भूविकासकाला सहा महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:31 AM2019-07-24T00:31:12+5:302019-07-24T00:32:12+5:30
कामठी येथील विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात मुरलीकृष्णा लॅन्ड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर अमरदेव यादव यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास एक महिन्यामध्ये ६ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश दिला व भरपाई न दिल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी येथील विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात मुरलीकृष्णा लॅन्ड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर अमरदेव यादव यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास एक महिन्यामध्ये ६ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश दिला व भरपाई न दिल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले.
होशियारसिंग असे तक्रारकर्त्याचे नाव असून, ते गार्डस् रेजिमेंटल सेंटरमध्ये कार्यरत आहेत. होशियारसिंग यांनी यादव यांच्या मौजा घोरपड येथील ले-आऊटमधील एक भूखंड ७ लाख ५० हजार रुपयात खरेदी केला होता. त्या भूखंडाचे सहा महिन्यात विक्रीपत्र करण्याचे ठरले होते. होशियारसिंग यांनी यादव यांना धनादेशाद्वारे ७ लाख ५० हजार रुपये दिले. दरम्यान, यादव हे निर्धारित वेळेत भूखंडाचे विक्रीपत्र करून देऊ शकले नाही. परिणामी, त्यांनी संबंधित रक्कम व्याजासह परत करण्यासाठी होशियारसिंग यांना सुरुवातीला ६ लाख ५० हजार रुपयाचे दोन धनादेश दिले. ते धनादेश बँक खात्यात कमी रक्कम असल्यामुळे १९ फेब्रुवारी व १२ सप्टेंबर २०१७ रोजी अनादरित झाले. त्यानंतर होशियारसिंग यांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून यादव यांच्याविरुद्ध जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. होशियारसिंग यांच्यातर्फे अॅड. एच. आय. कोठारी यांनी कामकाज पाहिले.