‘जेएनयू’बाबत संघ परिवार होणार आक्रमक
By admin | Published: February 24, 2016 03:31 AM2016-02-24T03:31:25+5:302016-02-24T03:31:25+5:30
देशाच्या राजधानीतील ‘जेएनयू’मधील (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) वादासंदर्भात संघ परिवार विरुद्ध डावे पक्ष-कॉंग्रेस आमनेसामने उभे ठाकले आहे.
युवा जागरण समितीतर्फे विशेष सभेचे आयोजन : अनुपम खेर, हनुमंतप्पा कुटुंबीयांची उपस्थिती
नागपूर : देशाच्या राजधानीतील ‘जेएनयू’मधील (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) वादासंदर्भात संघ परिवार विरुद्ध डावे पक्ष-कॉंग्रेस आमनेसामने उभे ठाकले आहे. या मुद्यावरून देशाचे राजकारण तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने थेट निषेध केला असून आता देशपातळीवर या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघभूमीतूनच याची सुरुवात होणार असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून विशेष सभेचे गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी नागपूरात आयोजन करण्यात आले आहे. ‘अभाविप’च्या ‘बॅनर’खाली हे आयोजन न करता युवा जागरण समितीच्या नावाखाली ही सभा बोलविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात असहिष्णुतेच्या मुद्यावरून मोदी सरकारच्या समर्थनार्थ उतरलेले अनुपम खेर तसेच शहीद लान्स नायक हनुमंतप्पा यांचे कुटुंबीय सहभागी होण्याची शक्यता आहे.
सीताबर्डी येथील सेवासदन हायस्कूलच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी ६ वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या जमिनीवरून राष्ट्रविघातक शक्तींना स्पष्टपणे संदेश देण्यात येईल, असे युवा जागरण समितीतर्फे सांगण्यात येत आहे व याच शब्दांत या सभेचा प्रचार करण्यात येत आहे. या सभेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर हे भाषण करणार आहेत. नागपूरच्या भूमीवरुन या प्रकरणात आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळाचे या सभेकडे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)