जोशी, जयस्वाल यांना मिळाले महामंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 09:37 PM2018-08-31T21:37:50+5:302018-08-31T21:39:37+5:30
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आता महामंडळांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा नागपुरात भाजप-सेना नेत्यांना मिळाला आहे. भाजपाचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी तर शिवसेनेचे माजी आमदार आशिष जैस्वाल यांची महाराष्ट्र खनिकर्म विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आता महामंडळांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा नागपुरात भाजप-सेना नेत्यांना मिळाला आहे. भाजपाचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी तर शिवसेनेचे माजी आमदार आशिष जैस्वाल यांची महाराष्ट्र खनिकर्म विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
या दोन्ही महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त आहे. संदीप जोशी यांनी सलग दोनदा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी वेळोवेळी त्यांच्या नावावर चर्चा झाली. मात्र, ऐनवेळी हुलकावणी मिळाली. अधिवेशन काळात झालेल्या विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या वेळी तर त्यांचे नाव निश्चित मानले जात होते. पण संधी हुकली. शेवटी लघु उद्योग विकास महामंडळासारखे महत्त्वाचे महामंडळ देऊन समाधान करण्यात आले आहे. नियुक्तीनंतर लोकमतशी बोलताना संदीप जोशी म्हणाले, आपण २० वर्षांपासून भाजपाचे काम करीत आहोत. महापालिकेत विविध जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविण्यात आल्या. त्या आपण पार पाडल्या. आता ही एक नवी जबाबदारी सोपविली आहे. तिचेही चीज होईल असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत पराभवानंतरही आशिष जैस्वाल हे शिवसेनेचा किल्ला ताकदीने लढवित राहिले. पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी चांगले काम केले. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांनाही खनिकर्म महामंडळ सोपविण्यात आले.
लघुउद्योगासाठी शासनाच्या योजना, त्यात येणाऱ्या अडचणी याचा अभ्यास करून रोडमॅप तयार केला जाईल. या क्षेत्रात बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी आपला प्रयत्न करील.
संदीप जोशी
अध्यक्ष, लघु उद्योग
विकास महामंडळ
‘‘पक्षाकडे काहीच मागितले नसतानाही संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करीत जनतेसाठी काम करू. चांगले काम करून राज्याला व विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न करू’’.
आशिष जैस्वाल
अध्यक्ष, खनिकर्म
विकास महामंडळ