खंडणी मागणाऱ्या पत्रकाराला रंगेहाथ अटक; आरटीओतील एजंटला मागितले १० लाख

By योगेश पांडे | Published: August 29, 2024 10:19 PM2024-08-29T22:19:46+5:302024-08-29T22:20:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विरोधातील बातमी प्रकाशित न करण्यासाठी खंडणी मागणाऱ्या हिंदी दैनिकाच्या एका पत्रकाराला पोलिसांनी रंगेहाथ अटक ...

Journalist arrested red-handed for demanding ransom; 10 lakhs asked to agent in RTO | खंडणी मागणाऱ्या पत्रकाराला रंगेहाथ अटक; आरटीओतील एजंटला मागितले १० लाख

खंडणी मागणाऱ्या पत्रकाराला रंगेहाथ अटक; आरटीओतील एजंटला मागितले १० लाख

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विरोधातील बातमी प्रकाशित न करण्यासाठी खंडणी मागणाऱ्या हिंदी दैनिकाच्या एका पत्रकाराला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

सुनील हजारी (वय ४४, गणेशपेठ) असे आरोपी पत्रकाराचे नाव आहे. हजारी शहरातील हिंदी वर्तमानपत्रातील शहर संपादक पदावर कार्यरत आहे. आरटीओतील एजंट धनराज ऊर्फ टिटू शर्माने (५५, बाबादीपसिंहनगर) या प्रकरणात पोलिसांकडे धाव घेतली होती. शर्मा अनेक वर्षांपासून ग्रामीण आरटीओशी जुळला आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर ग्रामीण आरटीओमधील एका प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात संबंधित शर्माची काय भूमिका आहे याबाबत हजारीने वृत्त प्रकाशित केले होते.

याच प्रकरणातील बातमी प्रसिद्ध न करण्याच्या बदल्यात आरोपीने संबंधित शर्माला १० लाखांची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर सात लाखांत डील झाली. २८ ऑगस्ट रोजी शर्माने त्याला एक लाखांचा पहिला हप्ता दिला होता. मात्र, त्यानंतर पैसे देण्याची इच्छा नसल्याने शर्माने सदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. उपायुक्त राहुल मदने यांच्या निर्देशांवरून सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा रचला. गुरुवारी आरोपी हजारी ८० हजार रुपये घेण्यासाठी व्हीसीए स्टेडियमजवळील चहाच्या टपरीजवळ पोहोचला. तेथून दोघे एका आईसक्रीमच्या दुकानात गेले. तेथे पोलिसांनी पैसे घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे खळबळ उडाली. पत्रकाराने पोलिसांशी अरेरावी करण्याचादेखील प्रयत्न केला. रात्री नऊ वाजताच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हजारीला रात्री लॉकअपमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रकरण दाबण्यासाठी दबाव
आरोपी मोठ्या वर्तमानपत्रात शहर संपादक असल्यामुळे या कारवाईमुळे खळबळ उडाली. याअगोदरदेखील नागपुरातील काही पत्रकारांविरोधात गुन्हे किंवा पोलिस तक्रारी झाल्या आहेत. मात्र, मोठ्या पदावरील पत्रकार रंगेहाथ सापडल्याची ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत काही मोठ्या व्यक्तींनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला; परंतु अखेर रात्री नऊ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून हजारीची सखोल चौकशी करण्यात येणार असून याअगोदर असे प्रकार कधी कधी झाले आहेत याचा शोधदेखील घेण्यात येईल.

एजंटकडे कुठून आले पैसे ?
एजंट शर्माने तक्रार केली असून त्याच्या भूमिकेबाबतदेखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्याने सात लाख देण्याची डील केली होती व एक लाख रुपयेदेखील दिले होते. त्याच्याकडे इतके पैसे कुठून आले व कुणाला वाचविण्यासाठी त्याने सात लाख रुपये देण्यासाठी मंजुरी दिली होती, त्याचप्रमाणे यात आरटीओतील कुणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीदेखील लिंक आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: Journalist arrested red-handed for demanding ransom; 10 lakhs asked to agent in RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.