पत्रकारांनी सर्वसामान्यांचे 'मूकनायक' व्हावे : प्रदीप आगलावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 12:22 AM2020-02-02T00:22:52+5:302020-02-02T00:24:46+5:30
पत्रकारांनी आपले कर्तव्य बजावत सामान्य समाजाचे मूकनायक झाले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ वर्तमानपत्र सुरू करण्यामागची पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यावेळी सर्वसामान्य बहुजन समाजाच्या व्यथा मांडणारे एकही वर्तमानपत्र नव्हते. त्यावेळी शाहू महाराजांच्या मदतीने बाबासाहेबांनी ही सुरुवात केली. देशात आज वेगळ्या अंगाने तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबला जात आहे आणि माध्यमेही अराजक सत्तेच्या दावणीला बांधले गेले आहेत. अशावेळी पत्रकारांनी आपले कर्तव्य बजावत सामान्य समाजाचे मूकनायक झाले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स (बानाई) तसेच भारतीय बौद्ध महासभा, प्रबुद्ध भारत यांच्या संयुक्त विद्यमाने मूकनायक वर्तमानपत्राच्या शताब्दी वर्षानिमित्त डॉ. आंबेडकर पत्रकारिता शताब्दी समारोह आणि पत्रकारांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे, बानाईचे सचिव जयंती इंगळे, राहुल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. आगलावे पुढे म्हणाले, मूकनायक हे बाबासाहेबांच्या चळवळीचे माध्यम होते. सत्यमेव जयते करायचे असेल तर चळवळ सुरू राहिली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व नाट्यकर्मी प्रभाकर दुपारे यांना डॉ. आंबेडकर फियरलेस जर्नालिजम पुरस्कार देण्यात आला. प्रभाकर दुपारे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी अतिशय विपरीत परिस्थितीत वर्तमानपत्र सुरू केले. ज्यावेळी समाजात लिहिणारे, वाचणारे कुणी नव्हते, अशा समाजाला त्यांनी जागे केले. चवदार तळ्याचे आंदोलन मूकनायकने गाजविल्याचा उल्लेख त्यांनी केला.
यावेळी लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक आनंद डेकाटे, निशांत वानखेडे, योगेंद्र शंभरकर यांच्यासह केवल जीवनतारे, रवी गजभिये, एस. सुदर्शन, पीयूष पाटील, नमन्नूर, हेमंत बारसागडे, अभय यादव, अविनाश महालक्ष्मे, सुनील तिजारे, रविकांत कांबळे, भीमराव लोणारे, जितेंद्र शिंगाडे, सुनील ढगे, उदय तिमांडे, रश्मी सहारे , मिलिंद फुलझेले, ए.के. दुबे आदी पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण निखाडे यांनी केले. बानाईच्या शिल्पा गणवीर यांनी सर्वांकडून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करवून घेतले.