आॅटोरिक्षाचा प्रवासच किफायतशीर!
By admin | Published: November 30, 2014 12:55 AM2014-11-30T00:55:30+5:302014-11-30T00:55:30+5:30
भाडे नाकारणे, भाडे ज्यादा घेणे आणि महत्त्वाची बाब म्हणजे गरज असेल त्या वेळी वाहन उपलब्ध न होणे या आणि अशा अनेक कारणांमुळे नागपुरात धावणाऱ्या आॅटोरिक्षांचा प्रवास नकोसा होतो.
उपराजधानीतील वाहतूक सुविधा : कुल कॅब खर्चिक मात्र आरामदायी
नागपूर : भाडे नाकारणे, भाडे ज्यादा घेणे आणि महत्त्वाची बाब म्हणजे गरज असेल त्या वेळी वाहन उपलब्ध न होणे या आणि अशा अनेक कारणांमुळे नागपुरात धावणाऱ्या आॅटोरिक्षांचा प्रवास नकोसा होतो. परंतु कुल कॅबसारख्या खासगी कंपन्यांनी निर्माण केलेली स्पर्धा पाहता आॅटोरिक्षा अजूनही आडमुठ्या भूमिकेतच असल्याचे दिसून येत आहे. कुल कॅब वाहने आरामदायी आणि घरपोच सेवा देत स्पर्धा निर्माण केली असली तरी आर्थिकदृष्ट्या परडवणाऱ्या आॅटोरिक्षा आजही प्रवाशांच्या मनात घर करून आहेत. आर्थिकदृष्ट्या आणि अन्य सोयी-सुविधांबाबतीत या वाहतूक सेवा नागपूरकरांसाठी किती किफायतशीर आहेत याचा ‘लोकमत’ प्रतिनिधीने आढावा घेतला असता, कुल कॅबचा प्रवास थोडा खर्चिक असला तरी, आरामदायी आहे, मात्र आॅटोरिक्षा मीटरने चालल्यास कॅबच्या तुलनेत ती किफायतशीर आहे.
ओला कॅब
ओला कॅब टॅक्सीच्या कॉल सेंटरवर लोकमत प्रतिनिधीने टॅक्सी मागवल्यानंतर ३० मिनिटांत पोहचण्याचे आश्वासन दिले. पहिल्या दोन किलोमीटरसाठी ४९ रुपये तर नंतरच्या प्रति किलोमीटरला १४ रुपये भाडे आकारण्यात येईल, अशी माहिती दिली. यांच्या वातानुकूलित गाड्यातून प्रवास सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन किलोमीटरचे भाडे ६३ रुपये पडले. भाडे दिल्यावर त्याची पावती मिळाली. कंपनीकडून टॅक्सीतच बसवलेल्या मोबाईल ट्रॅक आणि जीपीएस यंत्रणेमुळे बिल दिसूनही येते. गाडीच्या चालकाशी संवाद साधल्यावर चालकाने सांगितले, कॅबमधून चांगले उत्पन्न मिळते. ही कॅब चालवण्यापूर्वी कशी यंत्रणा असते, याचे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले आहे. यात प्रवाशांशी सौजन्याने कसे वागावे हे समजावून सांगितले जाते. दिलेल्या प्रवासी भाड्याच्या टार्गेटवर कमिशन मिळते, असेही तो म्हणाला.
विंग्स कॅब सर्व्हिसेस
शहरात कोला कॅब सारखीच विंग्स कॅब सर्व्हिसेस सुरू आहे. मात्र या दोघांच्या भाड्यात तफावत आहे. विंग्स कॅब पहिल्या तीन किलोमीटरसाठी ४८ रुपये तर त्यानंतरच्या प्रति किलोमीटरसाठी १६ रुपये आकारले जाते. यांच्या कॉल सेंटरवर फोन करून गाडी मागितली असता जागेचे लोकेशन घेत २५ मिनिटांच्या आत गाडी उपलब्ध होण्याचे आश्वासन दिले. मात्र गाडी १५ मिनिटांच्या आतच पोहचली. चालकाने फोन करून गाडी आल्याची माहिती दिली. चार किलोमीटरच्या प्रवासाला ६४ रुपये भाडे लागले. भाडे दिल्यावर त्याची पावती मिळाली.
चालकाने सांगितले, याआधी खासगी टॅक्सी चालवत होतो. यातून मिळणारे उत्पन्न चांगले आहे. ही कॅब चालवताना आरामही मिळतो, असेही ते म्हणाले.
टॅक्सी, आॅटोरिक्षाचा घोळ
कॅबच्या सुखद प्रवासाच्या तुलनेत टॅक्सी व आॅटोरिक्षाचा प्रवास अडचणीचा गेला. हे दोन्ही वाहन शोधण्यापासून प्रवास सुरू झाला. रेल्वे स्थानकाबाहेर एकच टॅक्सी उभी होती. त्यातही काही तरुण बसलेले होते. चार किलोमीटर अंतरावरील ठिकाण सांगितल्यावर चालकाने १५० रुपये भाडे सांगितले. आॅटोरिक्षाला याबाबत विचारले असता त्याने १२५ रुपये सांगितले. मात्र मीटरने प्रवास करण्यास चालकाने नकार दिला. आॅटोरिक्षाची शोधाशोध सुरू झाल्यावर एक आॅटोरिक्षा मीटरने चलण्यास तयार झाला. चार किलोमीटरला त्याने ५६ रुपये भाडे आकारले. एकाच मार्गावरून प्रवास करताना कुल कॅबपेक्षा आॅटोरिक्षाचे भाडे जरी कमी असले तरी ही टॅक्सी किंवा आॅटोरिक्षा मिळवण्यासाठी होणारी धावपळ, भाड्यामधील घासाघीस, आसनव्यवस्था, अस्वच्छता पाहता कुल कॅब बरी असल्याचे लक्षात येते. मात्र प्रवास भाड्याची तुलना केल्यास आॅटोरिक्षा मीटरने चालत असतील तर ती परवडणारी आहे.