अन् तोफांच्या आवाजाने सुरू झाला आनंदोत्सव : सीताबर्डी किल्ल्यावर फडकला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:00 AM2020-08-15T01:00:14+5:302020-08-15T01:01:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्याची पहाट बघण्यास आसुसलेल्या पारतंत्र्य भारतातील नागरिकांची भावना कशी असेल, हे सांगणारे आज क्वचितच ...

Joy festival started with cannon roar : Tricolor fluttered on Sitabardi fort | अन् तोफांच्या आवाजाने सुरू झाला आनंदोत्सव : सीताबर्डी किल्ल्यावर फडकला तिरंगा

अन् तोफांच्या आवाजाने सुरू झाला आनंदोत्सव : सीताबर्डी किल्ल्यावर फडकला तिरंगा

Next
ठळक मुद्देस्वातंत्र्याचा अरुणोदय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्याची पहाट बघण्यास आसुसलेल्या पारतंत्र्य भारतातील नागरिकांची भावना कशी असेल, हे सांगणारे आज क्वचितच उरले असतील. जे काही कळते इतिहासातील कात्रणांवरूनच. स्वातंत्र्याच्या सूर्योदयाचा तो काळ न भूतो न भविष्यती, असाच असेल हे मात्र तत्कालीन परिस्थितीवरून ठामपणे सांगता येते आणि त्याचीच साक्ष नागपूरही देते. १४ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा पं. जवाहरलाल नेहरू यांनी केली आणि त्याच वेळी रात्री १२ वाजता नागपूरच्या सीताबर्डी किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडविला गेला. सोबत स्वतंत्र भारताचा नाद सर्वदूर पोहोचावा म्हणून तोफांचा गडगडाट करण्यात आला. या गडगडाटामुळे निदे्रत असलेल्या नागपूरकरांनी खडबडून जागे होत विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
कुठल्याही आनंदाला खूप मोठी पार्श्वभूमी असते. दु:खाचे अनेक सोस भोगल्यानंतर येणारे सुख गगनाहून ठेंगणे वाटायला लागते आणि स्वातंत्र्याचा तर तो क्षण त्याहीपेक्षा मोठा होता. १५० वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांची सत्ता भारतात खºया अर्थाने १८१८ मध्ये पेशवाईचा पाडाव झाल्यानंतरच बसली. तरी देखील नागपूरवर युनियन जॅक फडकायला पुढचे २५ वर्षे लागली. दुसरे रघूजी भोसले यांच्या पराक्रमामुळे इंग्रजांना नागपूर सर करणे बरेच कठीण गेले. १८५३ मध्ये कूटनीतीने इंग्रजांनी भोसल्यांचे राज्य काबीज केले आणि नागपूरच्या महाल येथील किल्ल्यावरील भगवा जरीपटका उतरला. तेव्हापासूनच नागपूरची जनता युनियन जॅक अर्थात इंग्रजांच्या गुलामीत गेली. पुढे अनेक घडामोडी झाल्या, आंदोलने झाली. देशप्रेमाने ओतप्रोत असलेले क्रांतिकारक आणि अहिंसेने गड सर करणारे पुढारी यांनी अथक प्रयत्नाने अनेक स्थित्यंतरे घडवून आणली आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. नेहरूंच्या भाषणाने गहिवरलेले भारतीय आनंदाने नाचायला लागले. तेच चित्र नागपुरातही होतेच. त्या क्षणाच्या स्मृती आजही रोमांच उत्पन्न करणाऱ्या ठरतात. शहरात विजयोत्सव सुरू झाला. कॉटन मार्केट, इतवारी, टिळक पुतळा, महालसह शहरातील सर्वच भागातून लोक रस्त्यावर उतरले. सर्वत्र एकच घोष होता... भारत माता की जय, महात्मा गांधी की जय.. याच घोषणा प्रत्येकाच्या मुखात होत्या. अनेकांनी साखर वाटून आनंद साजरा केला. मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा जल्लोष पुढे अनेक दिवस होता. पारतंत्र्यांच्या कुटिल जाळाला पार करत प्रत्येकाच्याच मनात स्वातंत्र्याच्या सूर्योदयाची ज्वाळा फडकत होती.

पं. रविशंकर शुक्ला होते प्रधानमंत्री
२६ फेब्रुवारी १९४७ रोजी इंग्रजांनी भारत सोडून जाण्याची अधिकृत घोषणा केली. त्याच अनुषंगाने मार्च १९४६ मध्ये मध्यप्रांताच्या निवडणुका झाल्या. तेव्हा नागपूर मध्यप्रांताची राजधानी होती. पं. रविशंकर शुक्ला (यांच्याच नावे आज सिव्हील लाईन्स येथील रविभवन आहे) प्रधानमंत्री झाले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनाच प्रधानमंत्री म्हटले जाई. त्यांच्या मंत्रिमंडळात द्वारकाप्रसाद मिश्रा, दुर्गाशंकर मिश्रा, एस. व्ही. गोखले, आर. के. पाटील, पी. के. देशमुख, डॉ. डब्ल्यू. एस. बारलिंगे व डॉ. एम. हसन यांचा समावेश होता. देश स्वतंत्र झाला तेव्हा शुक्ला मंत्रिमंडळच सत्तेत होते.

इंग्रज गव्हर्नर फ्रेड्रीक बर्न यांना निरोप
१४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यप्रांताचे गव्हर्नर फ्रेड्रीक बर्न यांना निरोप दिला गेला आणि इंग्रजी सत्तेचा सूर्यास्त झाला. त्यांची जागा भारतीय गव्हर्नर म्हणून मंगलदास मंचाराम पक्वासा यांनी घेतली. पक्वासा दुपारीच मुंबईहून नागपुरात आले होते व संध्याकाळी त्यांनी गव्हर्नरपदाची शपथ घेतली.

स्वातंत्र्य कैदांना केले मुक्त
स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेले अनेक स्वातंत्र्यसैनिक कैदेत होते. त्यांना स्वातंत्र्यदिनाचा सोहळा बघता यावा म्हणून, आठ दिवस आधीच त्यांना मुक्त करण्यात आले. त्यामुळे वातावरणात एक नवाच आनंद पसरला होता.

Web Title: Joy festival started with cannon roar : Tricolor fluttered on Sitabardi fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.