दीपावलीच्या पूर्वसंध्येला नागपूर मनपामध्ये आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:08 AM2018-11-07T00:08:35+5:302018-11-07T00:09:23+5:30
तणावाखालील कर्मचारी, कंत्राटदारांचे आंदोलन आणि घोषणांनी दुमदुमणाऱ्या महापालिका मुख्यालयात मंगळवारी नगरसेवकांची गाणी व शेरोशायरीमुळे आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. महापालिका मुख्यालयात आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने प्रथमच दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तणावाखालील कर्मचारी, कंत्राटदारांचे आंदोलन आणि घोषणांनी दुमदुमणाऱ्या महापालिका मुख्यालयात मंगळवारी नगरसेवकांची गाणी व शेरोशायरीमुळे आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. महापालिका मुख्यालयात आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने प्रथमच दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड, आयुक्त रवींद्र ठाकरे, बसपा गटनेते मोहम्मद जमाल, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, उपनेते नरेंद्र बोरकर, जितेंद्र घोडेस्वार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त राजेश मोहिते, रंजना लाडे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त अशोक पाटील, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक आयुक्त महोश मोरोणे, प्रकाश वराडे, गणेश राठोड आदी उपस्थित होते
महापालिकेमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांना एकत्र आणून त्यांच्याशी हितगूज करणे, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना संधी देत दीपावली उत्सव साजरा करणे, हा या स्नेहमिलनामागील उद्देश होता. उपक्रमाचे कौतुक करीत महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महापालिका एक कुटुंब आहे व आपण सर्व त्यातील सदस्य आहोत, याची जाणीव या स्तुत्य आयोजनामुळे होत आहे. रवींद्र ठाकरे यांनी आयुक्तांचा प्रभार स्वीकारल्यापासून त्यांनी महापालिकेत सकारात्मक ऊर्जा पेरण्याचे काम केले. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी व सर्व पदाधिकारी, नगरसेवकांना एकत्र आणून दीपावलीचा आनंद द्विगुणित केला.
कामाच्या ताणामध्ये अशा आनंददायी कार्यक्रमाचे आयोजन प्रोत्साहित करते. महापालिकेत असे आनंददायी कार्यक्रम होणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रारंभी रवींद्र ठाकरे यांनी दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाची संकल्पना विशद केली. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांचा व राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले.