सोळावं वरीस आनंदाचं...
By admin | Published: January 1, 2016 04:12 AM2016-01-01T04:12:19+5:302016-01-01T04:12:19+5:30
विद्युत रोषणाईचा झगमगाट, संगीताचे सूर आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात गुडबाय २०१५ असे म्हणत मावळत्या
युवकांचा न्यू इयर बॅश धडाक्यात पण ‘इनडोअर’ : फुटाळ्यावर तरुणाईची धूम
नागपूर : विद्युत रोषणाईचा झगमगाट, संगीताचे सूर आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात गुडबाय २०१५ असे म्हणत मावळत्या वर्षाला गुरुवारी निरोप देण्यात आला. शहरातील हॉटेल, ढाबे, इमारतींच्या गच्चींवर आयोजित रंगीत-संगीत पार्टी रंगली. रात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजाळला. वेलकम २०१६ असा जल्लोष करीत नवीन वर्षाचे स्वागत करताना धम्माल नृत्याचा पिंगा घालत तरुणाईने नव्या वर्षाचे जोरदार स्वागत केले. यानिमित्ताने सर्वत्र सुरू असलेला जल्लोष रात्री उत्तरोत्तर अधिकच रंगत गेला. सोळावं वरीस म्हणजे नवोन्मेषाचे, नवलाईचे आणि उत्साहाचे. यंदा टीन एजर्सने चांगलाच माहोल केला. वातावरणात मोकळेपणा आला आहे आणि खिशात बऱ्यापैकी पैसा या पिढीजवळ आहे. त्यात शिक्षण आणि परिस्थितीमुळे मुलांमध्ये आणि मुलींमध्येही आत्मविश्वास आहे. त्यामुळे हे टीनएजर्स नव्या वर्षाच्या स्वागतासाठी फुटाळ्यावर एकत्रित आले होते. कुणी पब्समध्ये तर कुणी टेरेसवर धम्माल करीत होते. संयमित पण जल्लोषात हा आनंदसोहळा रंगला. (वृत्त पान ५)
उत्फुल्ल तरुणाईने फुलला फुटाळा
फुटाळा तलावावर नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आ. प्रकाश गजभिये यांनी आॅर्केस्ट्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी महाविद्यालयीन युवक-युवतींसह अनेक लोक आपल्या कुटुंबासह फुटाळ्याला आले होते. बुट्टा, गरमागरम भजे, दाबेली आदींवर ताव मारून ते नव्या वर्षाचा आनंद घेत होते. नागपुरात जवळपास हजार लोक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एकत्रित झाल्याचे फुटाळा तलाव हे एकमेव सार्वजनिक ठिकाण होते. आॅर्केस्ट्राच्या गीतावर तुफान ताल धरीत युवक-युवतींनी येथे नृत्याचा धमाल आनंद घेतला. यात युवतींचाही लक्षणीय सहभाग होता. याप्रसंगी उत्फुल्ल तरुणाईने फुटाळा फुलला होता. अनेक मित्र-मैत्रिणी येथे रात्री १२ पर्यंत एकमेकांचा हात हातात घेऊन नव्या वर्षाचे स्वागत करीत होते. पण १२ वाजल्यानंतर मात्र पोलिसांनी सर्वांनाच घरी जाण्याची विनंती केल्याने रात्री फुटाळा परिसर शांत झाला. ^
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच
गर्दीत कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी ३८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यातील सर्वाधिक आठ कॅमेरे शंकरनगर चौक ते लॉ कॉलेज चौक मार्गावर लावण्यात आले. सीताबर्डी, व्हेरायटी चौकात सहा कॅमेरे, अंबाझरी गार्डन-चार, फुटाळा चौपाटी-चार, बॉटनीकल गार्डन-चार, ट्रॅफिक पार्क-चार, लिबर्टी ते सदर-चार आणि पूनम चेंबर बैरामजी टाऊन भागात चार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.