न्या. लोया प्रकरणात पोलिसांनी तपासली कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:21 PM2018-01-29T22:21:59+5:302018-01-29T22:26:43+5:30

सीबीआय न्यायालयाचे दिवंगत न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात २ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने सादर केलेल्या अहवालाची पूरक नोंदी तपासण्यासाठी रविवारी पोलीस पथकाने स्थानिक रविभवनात चौकशी केली.

In the Judge Loya death case, the police checked the documents | न्या. लोया प्रकरणात पोलिसांनी तपासली कागदपत्रे

न्या. लोया प्रकरणात पोलिसांनी तपासली कागदपत्रे

Next
ठळक मुद्देरविभवनात प्रदीर्घ चौकशी : कॉटेजचीही पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीबीआय न्यायालयाचे दिवंगत न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात २ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने सादर केलेल्या अहवालाची पूरक नोंदी तपासण्यासाठी रविवारी पोलीस पथकाने स्थानिक रविभवनात चौकशी केली. रविभवनातील ज्या कॉटेजमध्ये न्या. लोया थांबले होते, त्या कॉटेजची पाहणी करून त्यावेळी पाहुण्यांच्या नोंदीचे रजिस्टरही तपासले.
एका न्यायमूर्तीच्या कन्येच्या विवाहासाठी न्या. लोया नागपुरात आले होते. ते रविभवनमधील कॉटेजमध्ये थांबले असताना १ डिसेंबर २०१४ च्या पहाटे त्यांच्या छातीत कळ आली. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. न्या. लोयांच्या मृत्यूसंदर्भात त्यांच्या बहिणीने संशय व्यक्त केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. लोया हे अमित शहांशी संबंधित असलेल्या सोहराबुद्दीन खटल्याची सुनावणी करीत होते. त्यामुळे देशभर उलटसुलट चर्चेला उधाण आले.
लोया खटल्याच्या सुनावणीवरून चार न्यायाधीशांनी निषेध व्यक्त केल्याने देशभर खळबळ निर्माण झाली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा या प्रकरणाची सुनावणी करीत आहेत तसेच यासंबंधाने दाखल चारही याचिकांवर २ फेब्रुवारीला एकत्र सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांना पुन्हा काही कागदपत्रे मिळतात काय, ते तपासण्याचे आदेश दिल्लीहून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वात सदर ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांच्यासह एक पथक रविवारी रविभवनात पोहचले. त्यांनी येथील पाच कॉटेजची पाहणी केली. ज्या कालावधीत लोया येथे थांबल्याचे सांगितले जाते, त्याची शहानिशा करण्यासाठी त्यावेळच्या रजिस्टरचीही तपासणी केली. त्यानंतर सुमारे तीन तास येथील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली.
रजिस्टरमध्ये नोंद नाही
न्या. लोया हे रविभवनात थांबले होते, त्यांना तेथेच १ डिसेंबर २०१४ च्या पहाटे छातीत कळ आली होती आणि तेथूनच त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले होते, असे सांगितले जाते. मात्र, लोया रविभवनातील कॉटेजमध्ये थांबल्याची नोंद त्या दिवशीच्या रजिस्टरमध्ये नाही, अशी खास सूत्रांची माहिती आहे. त्या दिवशी जे पाहुणे रविभवनातील विविध कॉटेजमध्ये मुक्कामी होते, त्यांच्या रजिस्टरमधील नोंदी पोलिसांनी मोबाईलमध्ये स्कॅन करून घेतल्याचे समजते. विशेष म्हणजे, या संबंधाने स्थानिक वरिष्ठांकडून माहिती मिळवण्यासाठी संपर्क केला. त्यांनी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल असल्याने या संबंधाने काही बोलणे योग्य होणार नसल्याचे म्हटले.

Web Title: In the Judge Loya death case, the police checked the documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.