न्यायाधीशांनी नैतिकता जपावी : शशिभूषण वहाणे यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 10:24 PM2019-06-06T22:24:12+5:302019-06-06T22:25:36+5:30
समाजामध्ये न्यायव्यवस्थेचा सन्मान कायम राहण्यासाठी न्यायाधीशांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वकील शशिभूषण वहाणे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजामध्ये न्यायव्यवस्थेचा सन्मान कायम राहण्यासाठी न्यायाधीशांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वकील शशिभूषण वहाणे यांनी व्यक्त केले.
अॅड. सतीश उके व अॅड. वैभव जगताप यांनी लिहिलेल्या ‘दि रेक्युजल : ज्युडिशियल डिसकॉलिफिकेशन लिगल अॅस्पेक्टस् इन इंडिया’ या पुस्तकाचे गुरुवारी सायंकाळी पंचशील चौकातील पत्रकार भवन सभागृहात प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. सुदीप जयस्वाल अध्यक्षस्थानी होते. अन्य अतिथीमध्ये राजे मुधोजी भोसले यांचा समावेश होता.
न्यायाधीशापुढे बरेचदा नातेवाईक, मित्र किंवा शत्रूचे प्रकरण सुनावणीसाठी येते. त्यावेळी संबंधित प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार देणे ही न्यायाधीशाची नैतिक जबाबदारी असते. अन्यथा न्यायव्यवस्थेची प्रामाणिकता व पारदर्शकता यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, असे अॅड. वहाणे यांनी पुढे बोलताना सांगितले.
आपला देश प्रभावी कायद्याच्या बाबतीत बराच मागे आहे असे भोसले यांनी सांगितले तर, हे पुस्तक प्रवाहाच्या विरोधात जाऊन लिहिण्यात आले आहे, असे मत जयस्वाल यांनी व्यक्त केले.