न्यायालयीन कामकाज ठप्प
By admin | Published: March 17, 2015 01:52 AM2015-03-17T01:52:48+5:302015-03-17T01:52:48+5:30
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्हा न्यायालयाच्या आवारात ११ मार्च रोजी एका फौजदाराने अॅड. नबी हसन
नागपूर : उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्हा न्यायालयाच्या आवारात ११ मार्च रोजी एका फौजदाराने अॅड. नबी हसन यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी वकिलांनी उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकला. त्यामुळे दोन्ही न्यायालयातील कामकाज ठप्प होते.
उच्च न्यायालयात केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी झाली. जिल्हा व सत्र आणि न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात केवळ रिमांड प्रकरणे आणि तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी झाली.
न्यायमंदिराच्या कम्पाऊंड गेटसमोर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल यांच्या नेतृत्वात वकिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून तासभर मूक निदर्शने केली. यात सरचिटणीस अॅड. नितीन तेलगोटे, उपाध्यक्ष अॅड. अक्षय समर्थ, अॅड. नचिकेत व्यास, अॅड. नीलेश गायधने, अॅड. श्रीकांत गौळकर, अॅड. गिरीश खोरगडे, अॅड. नितीन गडपाले, अॅड. परीक्षित मोहिते, अॅड. उज्ज्वल फसाटे, अॅड. संकेत यादव, अॅड. मनोज मेंढे, अॅड. श्रीकांत गावंडे, अॅड. समीर पराते, अॅड. हेमंत कोरडे, अॅड. अर्चना गजभिये, अॅड. अभय जिकार, अॅड. संजय बालपांडे, अॅड. आशिष नायक, अॅड. पराग बेझलवार, अॅड. लुबेश मेश्राम आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
हायकोर्टात तातडीच्या प्रकरणांचेच कामकाज
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांनी केवळ तातडीच्या प्रकरणावरील सुनावणीतच सहभाग घेतला. अन्य प्रकरणांच्या कामकाजात कोणीही उपस्थित झाले नाही. एरवी सायंकाळी ५ वाजतापर्यंत वकील व पक्षकारांनी गजबजून राहणारा उच्च न्यायालयाचा परिसर दुपारी १२ वाजतानंतरच शांत झाला. अनेक वकिलांनी याचिका व विविध अर्ज दाखल करण्याची कामे उरकली. नेहमीप्रमाणे कोणीच धावपळीत नव्हते. हायकोर्ट बार असोसिएशन आॅफ नागपूरचे सचिव अॅड. श्रद्धानंद भुतडा यांनी बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या आवाहनावरून वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजात सहभाग घेतला नाही अशी माहिती दिली.