जुगाडात जुगाड नागपूरकरांचा मास्क, तोंडाला लावतात दुपट्टा, रुमाल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 01:36 PM2022-01-17T13:36:30+5:302022-01-17T13:59:35+5:30
कोरोना संक्रमणाचा शिरकाव झाल्यापासूनच मास्क अनिवार्य झाले आहेत. तोंडाला मास्क लावलाच पाहिजे आणि तोही खरेदी करून.. मात्र असे जुगाडू नागपूरकरांना मान्य नाही.
नागपूर : कायद्याला एक कट मारून मार्ग काढण्यात नागपूरकर तरबेज आहेत. अडचणीतही पर्याय शोधण्याची कल्पना नागपूरकरांशिवाय आणखी कोणला जमेल? ‘युज वेस्ट ॲण्ड डू बेस्ट’ असा नाराच सध्या गाजत आहेत. मुळातच जुगाडू स्वभावाचे असलेल्या नागपूरकरांसाठी हा नारा, त्यांच्या इनोव्हेटिव्ह कल्पनांना धुमारे फोडणाराच ठरतो.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणाचा शिरकाव झाल्यापासूनच मास्क अनिवार्य झाले आहेत. तोंडाला मास्क लावलाच पाहिजे आणि तोही खरेदी करून, असे जुगाडू नागपूरकरांना मान्य नाही. आपल्या भात्यातील एक-एक शस्त्र उपसत त्यांनी त्यासाठीही वेगवेगळ्या शकला लढवल्या आहेत. त्याचा प्रत्यय शहरात कुठेही बघा, दिसून येतो. कुणी चेहऱ्याला रुमाल लावतो, तर कुणी दुपट्टा तर कुणी पदर मास्क म्हणून वापरून वेळ मारून नेत असतात. काहीजण तर गोठविणाऱ्या गारठ्यात वापरल्या जाणाऱ्या कानटोपड्याचाच वापर मास्क म्हणून करताना दिसतात.
दोन कोटींचा दंड; तरीही जुगाड थांबेना !
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने केलेल्या कारवाईत ४ सप्टेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२२ पर्यंत मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून दोन कोटींहून अधिक रुपयांचा दंड स्वीकारला आहे. असे असतानाही नागरिक मास्क वापरत नसताना दिसतात. शिवाय, जुगाड करण्यावरच भर देताना दिसतात.
मास्क न वापरणाऱ्यांवर झालेली कारवाई
* ४ ते १५ सप्टेंबर २०२० (प्रतिव्यक्ती २०० रुपयांप्रमाणे)
- कारवाई झालेल्यांची संख्या - ५४७०
- दंड म्हणून स्वीकारलेली रक्कम - १० लाख ९४ हजार रुपये
* १५ सप्टेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२२ (प्रतिव्यक्ती ५०० रुपयांप्रमाणे)
- कारवाई झालेल्यांची संख्या - ३७,९८०
- दंड म्हणून स्वीकारलेली रक्कम - १ कोटी ८९ लाख ९० हजार रुपये
* केवळ १५ जानेवारी २०२२ (प्रतिव्यक्ती ५०० रुपयांप्रमाणे)
- कारवाई झालेल्यांची संख्या - ६०
- दंड म्हणून स्वीकारलेली रक्कम - ३० हजार रुपये
३० रुपयांचा मास्क की ५०० रुपयांचा दंड?
दि. १५ सप्टेंबर २०२० पूर्वी मास्क न घालणाऱ्या व्यक्तीला २०० रुपये दंड लावला जात होता. मात्र, संक्रमणाची तीव्रता वाढत होती आणि नागरिक ऐकत नसल्याच्या स्थितीत स्थानिक प्रशासनाने दंडाची रक्कम ५०० रुपये केली. तरीदेखील नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसते. एन ९५ मास्क ३० ते ४० रुपयांत मिळत असतानाही नागरिक ५०० रुपये दंड भरण्यास तयार असल्याचे दिसून येते.
पोलिसांनाही दिसेना मास्क
आतापर्यंत महापालिकेच्या उपद्रव शोध पथकालाच मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार होते. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत; मात्र, नागरिकांच्या मनमर्जीपुढे पोलीसही हतबल झाल्याचे दिसून येते. नागरिक अरेरावी करीत असल्याने पोलीसही कानाडोळा करताना दिसतात.
मास्कच तुम्हाला वाचवू शकतो
कोरोनाचा विषाणू हा वायुमार्गाने शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असल्याने नाक व तोंड व्यवस्थित झाकले जाणे गरजेचे आहे. अशा स्थितीत थ्री लेयर मास्क वापरणेच योग्य ठरते. एन ९५ मास्क हा थ्री लेअर असल्याने तोच वापरणे योग्य असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांसोबतच वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. मात्र, लोक जुगाडातच रमलेले आहेत.