हातभट्टीच्या दारूसाठी वापरला जाणारा गूळ पकडला : मध्य प्रदेशातून तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:30 PM2019-03-26T23:30:56+5:302019-03-26T23:31:51+5:30

हातभट्टीची दारू बनविण्यासाठी वापरला जाणारा काळा गूळ मध्य प्रदेशातून नागपुरात आणला जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) पथकाने सावनेरजवळ जप्त केला. दोन टन असलेल्या या गुळाची किंमत ४६ हजार रुपये आहे. महसूल चुकवून गुळाची तस्करी करणारा वाहन चालक मनोज शेंडे (वय २२, रा. बोरगाव (रेमंड), ता. सौंसर, छिंदवाडा) आणि वाहन मालक जगदीश मुन्नीलाल गुप्ता (वय ५६, रा. कोराडी) या दोघांना अटक करण्यात आली.

Juggernaut used for country liquor seized: Smuggling from Madhya Pradesh | हातभट्टीच्या दारूसाठी वापरला जाणारा गूळ पकडला : मध्य प्रदेशातून तस्करी

हातभट्टीच्या दारूसाठी वापरला जाणारा गूळ पकडला : मध्य प्रदेशातून तस्करी

googlenewsNext
ठळक मुद्देगुळासह वाहनही जप्त, चालक, मालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हातभट्टीची दारू बनविण्यासाठी वापरला जाणारा काळा गूळ मध्य प्रदेशातून नागपुरात आणला जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) पथकाने सावनेरजवळ जप्त केला. दोन टन असलेल्या या गुळाची किंमत ४६ हजार रुपये आहे. महसूल चुकवून गुळाची तस्करी करणारा वाहन चालक मनोज शेंडे (वय २२, रा. बोरगाव (रेमंड), ता. सौंसर, छिंदवाडा) आणि वाहन मालक जगदीश मुन्नीलाल गुप्ता (वय ५६, रा. कोराडी) या दोघांना अटक करण्यात आली.
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिवसनखोरी आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू काढली जाते. त्यासाठी दारू गाळणारी मंडळी मध्य प्रदेशातून नियमित काळा गूळ मागवतात. नेहमीप्रमाणे मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात काळा गूळ आणला जाणार असल्याची माहिती एक्साईज अधिकाऱ्यांना मिळाली. त्या आधारे अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर, निरीक्षक सुभाष हनवते यांनी मध्य प्रदेशच्या सीमावर्ती नाक्यांवर सापळा लावून कारवाईचे आदेश दिले. मंगळवारी पहाटे सावनेरच्या सिरोंजी नाक्यावर एमएच ४०/ बीजी ०९६६ क्रमांकाची पिकअप व्हॅन येताना दिसल्याने एक्साईजच्या पथकाने ती थांबविली. तपासणीत व्हॅनमध्ये २ हजार १६० किलो काळा गूळ (भेल्या) आढळला. त्यानंतर केलेल्या चौकशीत वाहनचालक मनोज याने दिलेल्या माहितीवरून वाहन मालक जगदीश गुप्ता यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. चौकशीत गुप्ता नेहमीच काळ्या गुळाची तस्करी करीत असल्याचे पुढे आले. गुप्ताविरुद्ध १५ मार्च २०१८, १०ऑगस्ट २०१७ तसेच १ सप्टेंबर २०१७ ला हातभट्टीच्या दारूसाठी काळ्या गुळाची तस्करी केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. गुप्ताच्या सांगण्यावरून कोणतेही बिल न घेता महसूल चुकवून मध्य प्रदेशातून हा गूळ महाराष्ट्रात आणला जात असल्याचेही मनोजने एक्साईजच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी ४६ हजारांचा गूळ तसेच तीन लाखांचे वाहन जप्त केले. वाहन चालक मनोज आणि वाहन मालक गुप्ता या दोघांनाही अटक करण्यात आली. निरीक्षक केशव चौधरी, द्वितीय निरीक्षक बाळासाहेब भगत आणि रावसाहेब कोरे यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Juggernaut used for country liquor seized: Smuggling from Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.